लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : परिवहनच्या सेवेत टप्याटप्याने नवीन इलेक्ट्रीक बस प्रवासासाठी उपलब्ध होत आहेत. त्यात परिवहनचे कधी नव्हे ते उत्पन्न २७ लाखाहून पुढे गेले आहे. एकूणच उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु दुसरीकडे परिवहनला आता सेवेतून निवृत्त होणाºया कर्मचाºयांचे टेन्शन अधिक वाढल्याचे दिसत आहे. वर्षभरात परिवहनमधून १४५ कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत. तसेच आता पुढील वर्षभरात आणखी ७५ हून अधिक कर्मचारी सेवेतून निवृत्त होणार आहे. एकूणच परिवहनला सुगीचे दिवस येत असतांना निवृत्त होणाºया कर्मचाºयांमुळे परिरहनचे टेन्शन काहीसे वाढल्याचे दिसत आहे.
परिवहन समितीने मंगळवारी महापालिका आयुक्तांकडे परिवहनचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सभापती विलास जोशी यांनी ही खंत व्यक्त करुन दाखविली.
परिवहनच्या ताफ्यात आजच्या घडीला ३०० बस आहेत. तर त्यावर १५०६ चालक, वाहक व इतर कर्मचारी सेवेत आहेत. परिवहनच्या ताफ्यात आता टप्याटप्याने नवीन इलेक्ट्रीक बस येऊ घातल्या आहेत. पहिल्या टप्यात ११ बस सेवेत दाखल झाल्या आहेत. तर जून अखेर पर्यंत सर्व १६५ इलेक्ट्रीक बस सेवेत दाखल होणार आहेत. या बसचे तिकीट कमी असल्याने प्रवाशांचा देखील त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. त्यात परिवहनचा यापूर्वी खर्च हा वार्षिक ४१० कोटींच्या आसपास होता. परंतु सातवा वेतन आयोग, कर्मचाºयांना देण्यात येणारी पद्दोन्नती, सेवा निवृत्त कर्मचाºयांचे पेन्शन, कर्मचाºयांची थकबाकी व इतर परिवहनसाठी लागणाºया साहित्यामुळे परिवहनला खर्च हा आजच्या घडीला ५६८ कोटींच्या घरात गेला आहे. त्यामुळे परिवहनला आजही उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
एवढे असूनही परिवहनला सोमवारी २७ लाख ९८ हजारांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. यापूर्वी परिवहनला कधी १६ तर कधी २२ लाखापर्यंतचे उत्पन्न मिळत होते. परंतु त्यातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. असे असतांना परिवहनला आता सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाºयांचे टेन्शन अधिक असल्याचे दिसत आहे. परिवहनच्या ताफ्यातील १४५ कर्मचारी हे मागील वर्षभरात सेवानिवृत्त झाले आहेत. तर आता आणखी ७५ च्या आसपास कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे हळू हळू परिवहनमध्ये पोकळी निर्माण होण्याचे संकट गडद होऊ लागले आहे. त्यात शासनाकडून नवीन पदे भरण्यास ग्रीन सिग्नल नसल्याने यावर तोडगा कसा काढायचा असा पेच परिवहनला पडला आहे.
दरम्यान खाजगी तत्वावर येत्या काळात चालक भरले जाणार असून किमान वेतनद्वारे वाहक भरण्याचे प्रयत्न परिवहनमार्फत केले जाणार असल्याची माहिती परिवहनच्या सुत्रांनी दिली.