ठाणे : ठाणे शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्वच विभागांना कामाला लावले आहे. त्यातही अस्वच्छता करणाऱ्यांच्या विरोधात दंडाची कारवाई करण्यासही सुरवात केली आहे. मात्र पालिका कर्मचाऱ्यांकडून जर चूक झाली तर काय करायचे असा सवाल निर्माण झाला आहे. महापालिका मुख्यालयात महापौर दालनाच्या बाहेर असलेल्या ग्रीनरीवर पिचकारी मारणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्याला पालिका आयुक्तांनी गुरुवारी सांयकाळच्या सुमारास रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याच्याकडून नियमानुसार १५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. एकूणच या निमित्ताने, महापालिका आयुक्तांनी आपल्याच कर्मचाऱ्यावर कारवाई करुन एक वेगळा आर्दश घालण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला आहे.
ठाणे महापालिका आयुक्त बांगर यांनी महापालिकेची धुरा हाती घेतल्यानंतर शहर सौंदर्यीकरण, आणि साफसफाईला विशेष महत्व दिले आहे. त्यानुसार प्रभाग समिती निहाय ९० हून अधिक स्पॉट त्यांनी कचरामुक्त केले असून यापुढेही केले जाणार आहेत. तसेच रस्ते सफाई, कोणीही सार्वजनिक ठिकाणी थुंकणार नाही, यासाठी पथके तयार करुन जे थुंकतील त्यांच्या विरोधात दंडाची कारवाई सुरु केली आहे. परंतु गुरुवारी सांयकाळी महापालिका आयुक्त मुख्यालयातून जात असतांना महापौर दालनाबाहेर असलेल्या ग्रीनरीवर एका कर्मचा:याने पिचकारी मारली. त्याचवेळेस आयुक्तांनी त्याला रंगेहात पकडले. एकीकडे आपण ठाणोकरांना स्वच्छतेबाबत शिस्त लावत असतांना आपल्याच कर्मचा:याकडून अशा चुका होत असतील तर ते कितपत योग्य असा सवाल या निमित्ताने उपस्थित करीत. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यांनी या रिक्षा चालक कर्मचाऱ्याला असेच सोडले नाही तर त्याला १५० रुपयांचा दंड देखील आकारला. तसेच त्याची पावती देखील त्याला दिली.
एकूणच अशा पध्दतीने त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला शिस्त लावून त्यांच्याकडून यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घेतली आहे. आपल्या पासूनच त्यांनी याला सुरवात केल्याचे या निमित्ताने दिसून आले. ठाणोकर नागरीकांना शिस्त लावतांना पालिका कर्मचाऱ्यांना देखील स्वत:ला शिस्त लावून घेतली तर त्याचा फायदा निश्चितच ठाणे शहराला होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.