उल्हासनगर : महापालिकेने स्वतःची रोपवाटिकेची निर्मिती करून हजारो देशी रोपटे तयार करण्यात आल्याची माहिती गार्डन अधिक्षका दीप्ती पवार यांनी दिली. याच रोपवाटिकेतून हजारो झाडे शहरातील विविध ठिकाणी लागवड करण्यात येणार आहे.
उल्हासनगर महापालिका दरवर्षी मोकळे भूखंड, मैदाने, उद्यान, रस्त्याच्या बाजूला हजारो झाडाची लागवड करते. लागवड करणारे झाडे देशी असावी, अशी मागणी झाल्यावर महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी रोपवाटिकाची संकल्पना पुढे आली. कॅम्प नं-३ येथील इंदिरा गांधी उद्याना शेजारी महापालिकेने रोपवाटीकेची निर्मिती केली. रोपवाटिकेत विविध प्रजातीची ५ हजार पेक्षा जास्त रोपटे तयार करण्यात आल्याची माहिती अधीक्षिका पवार यांनी दिली. यातील रोपवाटिकेतील झाडे शहरातील विविध ठिकाणी लावण्यात येणार आहे. महापालिकेच्या रोपवाटिकेत साग ऑफ इंडिया, डोरंटा गोल्डन, तगर, हिमेलिया, क्रोटन लेमन, सन शाईन डोरंटो, अँग्लो सुपर पिंक, अँग्लो फायर वर्क, अलोकेशिया ब्लॅक, मनी प्लांट गोल्डन, पिलो मुन लाईट, पिलो सन रेड आदी प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त महापालिका रोपवाटिकेत शालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्र अभ्यासाकरिता विविध प्रजातीच्या वनस्पती उपलब्ध करून देण्यात आले आहे. कडुलिंब, तुळस, कोरफड, अडुळसा, कुडा, अस्वगंधा, ओवा, हळद, आले, गुलाब, झेंडू आदी औषधी वनस्पती आहेत. तसेच नागरिकांत झाडाची लागवडाची स्पर्धा निर्माण होण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित असल्याची महिती शहर अभियंता संदीप जाधव व गार्डन अधिक्षका दीप्ती पवार यांनी दिली आहे