उल्हासनगर : शहाड गावठण येथून वाहणाऱ्या उल्हास नदी पात्रातील एमआयडीसीजल उच्छदन केंद्राजवळ जलपर्णी वनस्पती, प्लास्टीक, तरंगत्या वस्तु महापालिकेने काढल्या आहेत. त्यामुळे नदी पात्र स्वच्छ झाले असून जलपर्णी वनस्पतीसह वाहून येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या, केरकचरा वेळोवेळी काढण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे.
उल्हासनगरातील संच्युरी कंपनी जवळील रिजेन्सी व अंटेलिया गृहसंकुल येथून वाहणाऱ्या उल्हास नदी पात्रात एमआयडीसीचे पंपिंग स्टेशन आहे. नदी पात्रातील पाणी उचलून शहाड म्हारळगाव जलशुद्धीकरण केंद्रावरून शहराला पाणी पुरवठा केला जातो. नदीतील ज्या ठिकाणाहून पाणी पुरवठा उचलला जातो, त्या ठिकाणी साचलेला जलपर्णी वनस्पती, प्लास्टिक पिशव्या व इतर कचरा बोटी व मजुरा मार्फत काढण्यात आला. तसेच निघालेला कचरा हा डंपर, जेसीबी मशीनद्वारे ठेकेदारा करवी उचलून डम्पिंगवर पाठविला जातो. नदी पात्रातून पाणवनस्पती काढण्याचे काम झाले असून नदी स्वच्छ झाली आहे.
उल्हास नदी मध्ये म्हारळ, ग्रामपंचायत, वरप ग्रामपंचायत व कांबा ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणवनस्पती आहे. धरणातून जेव्हा पाणी सोडण्यात येते तेव्हा या क्षेत्रामधील पाणवनस्पती वाहुन उल्हासनगर क्षेत्रामध्ये येते. त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिके मार्फत पाणवनस्पती काढण्याचे काम युध्द पातळीवर सुरुच राहणार असल्याची माहिती अतिरिक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे. नदी पात्र पाणवनस्पती मुक्त झाले असून वाहून आलेली जलपर्णी काढून टाकण्यात येणार असल्याची माहिती दिली..