ठाणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने ठाण्यात वज्रमुठ सेभेचे लावण्यात आलेले बॅनर पालिकेकडून उतरविण्यात आल्याने आता राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. बॅनर काढणाऱ्या महापालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आभार मानले आहेत. मात्र या बॅनरवर कारवाई करतांना शहरात इतर पक्षांचे लावण्यात आलेल्या बॅनर, पोस्टर दिसले नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईत १ मे रोजी महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीने ठाण्याच्या विविध भागात बॅनर व पोस्टर लावून या सभेची वातावरण निर्मिती केली होती. त्यातही वागळे पट्यात अर्थाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात अधिक प्रमाणात बॅनर लावण्यात आले होते. या संदर्भातील वृत्त देखील शुक्रवारी प्रसिध्द झाले होते. शिंदे यांच्या मतदार संघात बॅनर लावून राष्ट्रवादीने एक प्रकारे शिवसेनेला आव्हान देण्याचे काम केल्याचे दिसून आले होते. परंतु १ मेच्या आधीच हे बॅनर काढण्याची किमया महापालिका अधिकाऱ्यांनी केल्याने त्यावरुन आता राजकारण तापल्याचे दिसत आहे.
शुक्रवारी सकाळपासून ठाणे महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी सगळे बॅनर्स काढत फिरत आहेत असे आव्हाड म्हणाले. अनेक ठिकाणी इतर वेगवेगळ्या पक्षाचे आणि खासकरून सत्ताधारी पक्षाचे बॅनर्स लागलेले आहेत. त्याला साधा हातही लावण्याची हिम्मत त्यांनी केलेली नाही. आम्ही काल रात्री बॅनर्स लावले आणि आज सकाळपासून ठाणे महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकाºयांनी हे बॅनर्स उतरवायला सुरुवात केली. त्या अधिकाºयांमध्ये आघाडीचे नाव भालेराव यांचे आहे. मी त्यांना स्वत: फोन केला पण त्या फोनचे देखिल त्यांनी उत्तर दिलेले नाही. त्यामुळे आव्हाड यांनी त्यांचा मोबाइल क्रमांकाच सोशल मिडियावर जाहीर केला आहे. मात्र प्रशासनाने कसे वागाव हे काही आम्ही आता त्यांना समजवायला नको. जसे त्यांना सांभाळता तस आम्हांला ही सांभाळून घ्या. असे देखील ते म्हणाले आहेत. एकूणच यावरुन आता राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.ॉ
खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून १ रोजी कळवा भागात मराठी बाणा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कळवा हा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे ते देखील काही कार्यक्रम घ्यायचे झाले तर ९० फीट रस्त्यावर घेतात. आता त्याच ठिकाणी खासदार शिंदे यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आव्हाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या मतदार संघात शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला असतांना आता खासदार शिंदे यांनी त्यांना करारा जवाब देत थेट कार्यक्रमच कळव्यात आयोजीत करुन त्यांना एक प्रकारे धक्का देण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.