ठाणे : भाईंदर पश्चिम ते वसई किल्ला अशा खाडी मार्गे रो-रो सेवेचा मंगळवारी मोठ्या धडाक्यात शुभारंभ झाला. यावेळी बाविआ सह भाजप आणि उध्दव ठाकरे गटाने यानिमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शनही केले होते. परंतु त्यांचा हा आनंद आता काहीसा क्षणीकच ठरणार असल्याचे दिसत आहे. या फेरीबोट सेवेचा कोणताही औपचारीक शासकीय लोकार्पण सोहळा झालेला नसल्याची माहिती महाराष्ट्र सारगरी मंडळाने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. तर ही सेवा सध्या प्रायोगिक तत्वावरच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या रो-रो सेवेमुळे भार्इंदर व वसई किनारपट्टी असा प्रवास वाहने घेऊन करता येणार आहे. मंगळवारी आमदार क्षितीज ठाकुर हे वाहनाने बोटीतून बाहेर पडले. त्यानंतर बोट पुन्हा वसईच्या दिशेने रवाना झाली. तर दुसऱ्या बोटीवर खासदार राजन विचारे यांच्या हस्ते रो रो सेवेचे फीत कापून व श्रीफळ वाढवून उदघाटन करण्यात आले. परंतु आता हे उदघाटन औपचारीक नसल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाने एका प्रसिध्दी पत्रकारद्वारे स्पष्ट केले आहे. या फेरीबोट सेवेचा कोणताही औपचारीक शासकीय लोकापर्ण सोहळा अद्याप झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तूर्तास या फेरीबोटीचे जलमार्गातून होणारे नौकानयन तसेच बोटीतून प्रवासी व वाहनांची जेट्टीवर चढ उतार सुलभ व सुरक्षितपणे होत आहे किंवा कसे, या बाबींचा महाराष्ट्र सागरी मंडळाकडून अभ्यास करण्यात येत आहे. या सर्व बाबींची एकदा खात्री झाल्यानंतरच, फेरीबोट सेवेचा शासकीय लोकापर्ण सोहळा करण्यात येणारक आहे. त्यामुळे वसई, भार्इंदर या रो - रो फेरीबोट सेवेचा शासकीय लोकपर्ण सोहळा झाल्याचे सांगण्यात येत असले तरी ते चुकीचे असल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाने स्पष्ट केले आहे.