कसारा - शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एक महाकाय आजगर रस्ता ओलांडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. हा व्हिडिओ कसारा भागातील असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. अशीच चर्चा अन्य शहरांतही होती. या व्हायरल व्हिडिओसंदर्भात तरुणाईने विविध तर्क लावले. हा अजगर कसाऱ्यातील वनविभागाच्या हद्दीत असल्याची जोरदार चर्चा होत होती.
या व्हायरल व्हिडिओसंदर्भात माहिती घेतली असता हा व्हिडिओ चुकीचा व फेक असल्याचे निष्पन्न झाले. या व्हिडीओसंदर्भात आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने, तसेच या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सदस्यांनी रात्री 9.30 ते 11 दरम्यान कसारा फाट्यावरील नर्सरी नजीकच्या परिसरात मोठ्या बॅटरीच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना कुठल्याही प्रकारचे वन्यजीव वा त्याचे निशाण आढळून आले नाही. शाम धुमाळ, अक्षय राठोड, विनोद आयरे, प्रसाद दोरे यांनी हा शोध घेतला. अजगर नसल्याची खात्री झाल्यावर याबाबत ची माहिती नेट कऱ्यांना देण्यात आली...
कसारा परिसरात अजगर आणि नागांसह वन्यजीवांचे वास्तव्य - कसारा परिसरातील नर्सरी पॉईंटसह अनेक ठिकाणी 8 ते 10 फुटांचे अजगर, नाग, फोडसा आणि धामण जातीचे वन्यजीव, तथा बिबट्या सारख्या वन्य प्राण्यांचे वास्तव मोठ्या प्रमाणात आहेत. परिणामी कसारा सह परिसरात होत असलेली जंगलतोड व समाजकंटकांकडून जंगलात लावले जाणारे वणवे या मुळे जंगलातील वन्यजीव व वन्यप्राणी पाण्याच्या ठिकाणी तसेच रस्त्यावर येत आहेत. कसारा परिसरातील जंगलतोड,व वणवे आटोक्यात आले तर वन्य जीवांची घुसमट थांबू शकते.
वनविभागचे आव्हान... -दरम्यान व्हायरल व्हिडिओमुळे विविध तर्क वितर्क लावले जात असताना अनेक अफवाही पसरल्या. आपल्या परिसरात वन्यजीव व वन्यप्राणी यांचे प्रस्थ मोट्या प्रमाणात आहे. यामुळे आपण वन्याजिवांची काळजी घ्यायला हवी आणि आपण सुरक्षित रहावे, असे आवाहन वनविभगाकडून करण्यात येत आहे.