डोंबिवली: बेपत्ता असलेल्या चंद्रप्रकाश लोवंशी यांचा मृतदेह हत्या केलेल्या आणि अंगाला दगड बांधलेल्या अवस्थेत २५ जानेवारीला आडीवली गाव, नेताजी नगर परिसरातील विहिरीत आढळुन आला होता. दरम्यान या हत्येचे गुढ उकलण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे. पत्नी रिता हिने प्रियकर सुमित विश्वकर्मा याच्या मदतीने पती चंद्रप्रकाशची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी रिता हिच्यासह सुमितला अटक केली आहे तर त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेतले आहे.
चंद्रप्रकाशची अतिशय क्रुर आणि निदर्यपणाने हत्या केली गेली होती आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहीरीत टाकण्यात आला होता. हा गुन्हा उघडकीस आणणे पोलिसांपुढे आव्हान होते. दरम्यान २० जानेवारीपासून चंद्रप्रकाश हा बेपत्ता असल्याबाबतची तक्रार २१ जानेवारीला मानपाडा पोलिस ठाण्यात पत्नी रिता हिने दिली होती. त्यामुळे मृतदेह आढळुन येताच चौकशीअंती तो चंद्रप्रकाशचा असल्याचे समोर आले. पत्नी रिताची चौकशी केली असता ती काहीतरी लपवत असल्याचे समोर आले. तिने आडीवली येथे राहणारा सुमित विश्वकर्मा याला सर्व माहीती असल्याचे सांगितले. पोलिसांनी सुमीतला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्याने चंद्रप्रकाशची पत्नी रिता हिचे बरोबर त्याचे लहानपणापासुन प्रेमसंबध असल्याची माहिती देत हत्येच्या गुन्हयाची कबुली दिली. दोघांना पोलिसांनी अटक केली तर सुमीतला सहकार्य करणा-या त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांना देखील ताब्यात घेतले आहे.
चार महिन्यांपासून रचला जात होता हत्येचा कट
चंद्रप्रकाशला संपविण्यासाठी पत्नी रिता आणि तीचा प्रियकर सुमीत चार महिन्यांपासून कट रचत होते. २० जानेवारी ही तारीख निश्चित केली गेली. सुमीत ने आपल्या अल्पवयीन मित्रांच्या मदतीने चंद्रप्रकाशला जबरदस्तीने कारमध्ये घातले आणि आडीवली येथील निर्जनस्थळी नेवून धारदार शस्त्राने त्याचा निर्घुण खून करून त्याच्या मृतदेहाला भला मोठा दगड लावून तो विहीरीत फेकला होता.