प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : महिनाभरापुर्वी मंडपांच्या परवानगीसाठी अर्ज देऊनही अद्यापही गणेशोत्सव मंडळांना परवानगी न मिळाल्याने मंडपाचे काम रखडले आहे. आठ दिवसांवर उत्सव आला असला तरी पालिकेने मंडपासाठी परवानगी देण्यास दिरंगाई दाखविली आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळे परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत तर काहींनी परवानगीची वाट पाहून मंडप देखील बांधले आहेत.गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत.
अवघ्या काही दिवसांतच आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे आयोजन सुरू झाले आहे. परंतु ज्या मंडपात गणरायाची स्थापना होणार आहे त्या मंडपाला अद्याप पालिकेकडून परवानगी दिली नसल्याची नाराजी गणेशोत्सव मंडळांनी व्यक्त केली. पुर्वी मंडपाच्या परवानगीसाठी पालिकेकडे अर्ज केले जात. तिथून एनओसी मिळाली की फायर ब्रिगेड, पोलीस स्टेशन आणि वाहतूक शाखेकडून परवानगी मिळत आणि त्यानंतर महापालिका मंडपाच्या क्षेत्रफळानुसार पैसे आकारुन परवानगी देत. परंतू मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी धावपळ होऊ नये म्हणून यंदा एक खिडकी योजना सुरू करण्यात आली. एकाच ठिकाणी सर्व परवानग्या देण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. त्यानुसार या योजनेअंतर्गत मंडळांनी महिनाभरापुर्वी मंडपाच्या परवानगीसाठी अर्ज केले परंतू आठ दिवसांवर गणेशोत्सव येऊन देखील त्यांना परवानग्या मिळाल्या नाहीत. मंडपाची परवानगी मिळाल्यानंतरच उर्वरित परवानग्या मिळतात. परंतू एका परवानगीमुळे इतर परवानग्या रखडल्या असल्याचे गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष समीर सावंत यांनी सांगितले.
मंडपाला अद्याप परवानगी न मिळाल्याने मंडळांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. एक खिडकी योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज ज्या मंडळांनी केले त्यांना परवानग्या मिळाल्या आहेत. परंतू मंडळांच्या परवानग्या अडकल्याचे माझ्या तरी निदर्शनास आलेले नाही. ज्यांनी ऑफलाईन अर्ज केले आहेत. त्यांना परवानगी मिळाली नसल्यास त्याचा आज आढावा घेऊन तात्काळ परवानग्या देण्याचे आदेश दिले जातील असे पालिकेचे उपयुक्त - गजानन गोदापुरे यांनी सांगितले.