मीरा रोड : भाईंदरच्या रेल्वे पुलावरून सायंकाळी खाडीत पडलेली तरुणी तब्बल सात तासांनंतर चौक जेट्टीजवळील खाडी किनारी नांगरलेल्या बोटीजवळ सापडली. दलदलीच्या ठिकाणी रात्री दोनच्या सुमारास महिलेचा आवाज ऐकून बोटीवरील मच्छीमारांची बोबडीच वळली; परंतु नंतर ती महिला असल्याची खात्री पटल्यावर तिला बोटीत घेऊन किनाऱ्यावर आणले.
भाईंदर खाडीवरील रेल्वे पुलावर सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाकडून कमालीचे दुर्लक्ष केले जात असल्याने पुलावरून खाडीत उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या अथवा पुलावरून खाली पडण्याच्या घटना वाढत आहेत. काही दिवसांपूर्वीच खाडी पुलावरून खाडीत पडलेल्या एका अल्पवयीन मुलीला वाचवण्यात आले होते. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास पुलावरून रंजना विश्वकर्मा (रा. संतोष भुवन, नालासोपारा) ही तरुणी पुलावरून खाडीत पडली. त्यावेळी स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने नवघर पोलिसांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण ती सापडली नाही.
निर्जन आणि दलदलीचा असा आहे हा भाग
दरम्यान वादळी वारे व मुसळधार पाऊस असल्याने उत्तन-चौक भागातील मच्छीमार बोटी किनाऱ्याला आल्या असून चौक जेट्टीजवळील खाडी किनारी नांगरण्यात आल्या आहेत. हा भाग अतिशय निर्जन व दलदलीचा असून येथे कोणी चालत जाऊ शकत नाही. चौक जेट्टीवर जायचे तर लहान बोटीने ये-जा करावी लागते. हॉली स्काय बोटीचे मालक ऑलिव्हर बांड्या व अन्य मच्छीमार, खलाशी हे बोटीवर झोपले असताना रविवारी रात्री दोनच्या सुमारास अचानक एका महिलेचा आवाज येऊ लागला.
मच्छीमारांनी खातरजमा करून रंजनाला बोटीवर आणले. चहा व कपडे दिले. भरती आल्यावर लहान बोटीने तिला जेट्टीवर आणून उत्तन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी रंजनाचा प्राथमिक जबाब घेऊन नवघर पोलिसांकडे सोपवले. तिचा भाऊ काही महिन्यांपूर्वी खाडी पुलावरून पडून मरण पावल्याने ती मैत्रिणीसह पुलावर आली होती.