ठाणे : प्रथम मतदार होताना जबाबदार नागरिक झाल्यासारखे वाटले. आपला देशात लोकशाही आहे याचा अभिमान वाटतो आणि ती टिकवण्यासाठी आपण मतदान करणे आवश्यक आहे हे समजले. आपल्याला सरकार निवडायची संधी मिळणार आहे याचा आनंद वाटतो. लोकांच्या विकासासाठी मत द्यावे, भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला मत देऊ नये असे युवकांनी ठासून सांगितले. जातीधर्मावर आधारित राजकारण देशासाठी शांततेला आणि प्रगतीला धोकादायक आहे यावर सर्वांचे एकमत होते.
मी जागृत मतदार या विषयावर म. गांधींच्या स्मृतिदिनी ठाण्यात समता विचार प्रसारक संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले व्याख्यानमलिकेमध्ये जन – गण – मन अभियानाच्या समारोपाला महाविद्यालयीन प्रथम मतदार युवांचा टॉक शो आयोजित केला होता. संस्थेचे विश्वस्त आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे सचिव अजय भोसले यांनी प्रस्तावना केली. ठाण्यातील विविध महाविद्यालयातील युवांनी यात उत्साहाने भाग घेऊन मतदान आणि राजकारण यावर मोकळेपणाने चर्चा केली. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थेचे विश्वस्त डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी देशासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या सांविधानिक मूल्यांचे महत्व समजावून सांगितले. जागृत मतदार होण्यासाठी नागरिकांचे कर्तव्य आणि हक्क याबद्दल माहिती जाणून घेण्याची गरज प्रतिपादन केली. खैरालिया यांनी निवडणूकीत जात-पात आणि धर्माचा विचार न करता उमेदवाराचे काम बघून तुम्हाला योग्य वाटेल त्या उमेदवाराला मत द्यायला हवे असे सांगितले. जन - गण -मन अभियानाचे संयोजक राजेंद्र चव्हाण यांनी या अभियानाचा हेतू हा समाजात जाती धर्माच्या नवावर तेढ निर्माण न होण्यावर लक्ष केंद्रित करणे आहे हे मुलांना समजावले. नवीन मतदार नोंदणी ऑनलाइन कशी करायची याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. भारत जोडो अभियानाच्या मुक्ता श्रीवास्तव यांनी लोकशाहीमध्ये सर्वांचे मत विचारत घेऊन निर्णय घेण्याच्या पद्धतीचे महत्व विशद केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे यांनी अंधश्रद्धेविरूद्धची गाणी सादर केली. या कार्यक्रमाला शुभदा चव्हाण, हर्षलता कदम, मीनल उत्तुरकर, सुनील दिवेकर, सुब्रोतो भट्टाचार्य, हुकुमसिंह शिरसोदे, जॉन डिसा, अजित डफळे, प्रवीण खैरालिया, वृषाली कुलकर्णी असे अनेक मान्यवर उपस्थित होते.