मुंबई : रंगभूमी दिनी, पु.ल. युवा महोत्सवाचे उद्घाटन होणे, हा आगळावेगळा योग आहे, जिथे पु.ल. तिथे चैतन्य. हा लोककलेचा उत्सव, लोककलेचा जागर, हे चैतन्य आपल्या लाडक्या भार्इंच्या स्मृतीला यथोचित मानवंदना देणारे असल्याचे ९६व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी म्हटले. पु.ल. देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या ‘पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’तर्फे आयोजित पु.ल. युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी शाहीर दादा मांजरेकर, ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर, नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण, अभिनेत्री मेघा घाडगे यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी पु.ल युवा महोत्सव -२०१५ च्या मानचिन्हाचे अनावरण करण्यात आले.कलाकारांचा गौरव कलाकारांच्याच हस्ते व्हावा, या सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या भूमिकेनुसार कार्यक्रमाचे उद्घाटन कला क्षेत्रातल्या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाल्याचे यावेळी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे संचालक आशुतोष घोरपडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे पु.लं.चे ‘मैत्र’ हे पुस्तक देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी पु.लं.सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. पु.ल. देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या ‘पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’तर्फे बोरीवली येथे ‘अपूर्व पु.ल.’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पु.लं.च्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर आधारित अभिवाचनाचा दृकश्राव्य कार्यक्रम ‘अपूर्व पु.ल.’ ८ नोव्हेंबर संध्याकाळी ६:३० वाजता, बोरीवलीतील लिंक रोडवरील पु.ल. देशपांडे उद्यान येथे सादर होणार आहे. (प्रतिनिधी)
रंगभूमी दिनी पु.ल. महोत्सव हा दुर्मिळ योग
By admin | Published: November 10, 2015 12:18 AM