ठाणे : रत्नाकर मतकरींची आणि माझी ६५ वर्षांची मैत्री होती तरीही आज या वंचित मुलांचे दर्जेदार अभिवाचन पाहून, हे वंचितांच्या रंगमंचाचे मतकरींचे काम किती मोठे आहे, याची नव्याने जाणीव झाली. या उपक्रमाने कित्येकांच्या आयुष्यात नाट्यकलेचे स्फुल्लिंग फुलले. समाजाकडे ठळकपणे पहाण्याची दृष्टीकोन मिळाला. वंचित समूहातील युवकांची सामाजिक जाणीव विकसित झाली आणि त्यांचे आयुष्य बदलून गेले हे आज कळले, असे उदगार जेष्ठ साहित्यिक आणि पॉप्युलर प्रकशनचे संस्थापक रामदास भटकळ यांनी मतकरी स्मृती मालेच्या दुसर्या कार्यक्रमात बोलताना काढले.
वंचितांच्या रंगमंचाचे प्रणेते दिवंगत जेष्ठ साहित्यिक आणि नाटककार रत्नाकर मतकरी यांना मानवंदना म्हणून समता विचार प्रसारक संस्थेने मतकरी स्मृती माला हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये प्रत्येक महिन्यात गरीब वस्तीतील मुली मुलांच्या कालगुणांना आणि विचारशक्तीला चालना देणारा आदरांजली कार्यक्रम वंचितांच्या रंगमंचावर सादर करण्यात येणार आहे. सद्दयाच्या कोविड साथीमुळे झूम वर सादर झालेला कार्यक्रम हा या मालेतील दूसरा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात वस्तीतील मुलांनी त्यांच्या आवडीच्या लेखांचे किंवा नाटकाचे किंवा पाठ्यपुस्तकातील धड्यांचे उतारे अभिवाचनाच्या स्वरुपात सादर केले.
भरभरून प्रतिसाद मिळालेल्या या कार्यक्रमात ६५ मुलांनी आपल्या वाचनाचे विडियो पाठवून नोंदणी केली होती. या पैकी १७ मुलांची निवड करून त्यांच्या प्रत्यक्ष अभिवाचनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या वेळी जेष्ठ शिक्षणकर्मी अपर्णा भोळे आणि सुप्रसिद्ध नाट्यकर्मी उदय सबनीस यांनी निरीक्षकाचे काम केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा मनीषा जोशी होत्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संजय निवंगुणे या एकलव्य कार्यकर्त्याने केले. एकलव्य कार्यकर्ता सुशांत जगताप याने प्रास्ताविक केले.
या प्रसंगी उपस्थित सुप्रसिद्ध नाट्य - चित्र कलाकार, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर म्हणाले, या मुलांचे अप्रतिम अभिवाचन बघून मतकरी सरांनी लावलेल्या या वंचितांच्या रंगमंचाला रसाळ गोमटी फळे आली आहेत असेच वाटते. या उपक्रमाला जोडून घेवून मुलांना संधी उपलब्ध करून द्यायला मी उत्सुक आहे. अभिवाचनांचे निरीक्षक म्हणून काम करणारे सुप्रसिद्ध नाट्यकर्मी आणि वॉइस आर्टिस्ट उदय सबनीस यांनी मुलांचे कौतुक करताना सांगितलं की या मुलांची उतार्यांची निवड खूपच चांगली होती आणि त्यांनी भक्कम तालीम केली होती या वरुन त्यांना या कलेची किती आवड निर्माण झाली आहे हे स्पष्ट दिसते आहे. मतकरी सरांनी त्यांना दिलेल्या संधीचा त्यांनी पुरपूर उपयोग केला आहे ही खूप समाधानाची गोष्ट आहे. दुसर्या निरीक्षक ठाण्यातील जेष्ठ शिक्षिका आणि शिक्षणक्षेत्रात समाजकार्य करणार्या अपर्णा भोळे यांनी मुलांना शाबासकी देताना त्यांनी निवडलेल्या विषयांच्या वैविध्याचे आणि त्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे मुलांना त्यांच्या संवेदनक्षम वयात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचे विचार ऐकायला मिळतात, त्यांच्या वर योग्य विचारांचे संस्कार होतात ही या उपक्रमाचे यश आहे, त्यातून उद्याचे संवेदनशील नागरिक तयार होतील, असेही त्या म्हणाल्या. समता विचार प्रसारक संस्था करीत असलेल्या या कामाचं सर्वांनी कौतूक केलं.
वंचित वर्गातील मुलांचे उत्साही अभिवाचन-
या कार्यक्रमात तेजल बोबडे, अनघा काकडे, विनायक बागवे, नयन दंडवते, प्रणय घागरे, प्रतीक सावंत, सानिका पाटील, संजय निवंगुणे, सई मोहिते, समिक्षा मोहिते, आदिती नांदोस्कर, सविता काळे, आदर्श उबाळे, जयश्री जरांडे, ओवी घाणेकर, ज्योती जरांडे, दीपक मनिषा मंगेश या मुलांनी आपले अभिवाचन सादर केले. कार्यक्रमात शेवटी रत्नाकर मतकरी यांच्या ‘गांधी, अंतिम पर्व’ या अखेरच्या नाटकाच्या एका भागाचे अत्यंत प्रभावी असे अभिवाचन योगेश खांडेकर, मकरंद तोरसकर, अपूर्वा परांजपे, दिप्ती दांडेकर, रोहित माळवे, आदित्य कदम, अभिषेक साळवी यांच्या चमूने सादर केले.
या वेळी प्रतिभाताई मतकरी, सुप्रिया विनोद, गणेश मतकरी मुलांना प्रोत्साहन देण्यास आवर्जून उपस्थित होते, असे वंचितांच्या रंगमंचाच्या संयोजिका हर्षदा बोरकर यांनी सांगितले. झूम वर पार पडलेला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या उपाध्यक्ष लतिका सु. मा., सचिव हर्षलता कदम, विश्वस्त जगदीश खैरालिया व डॉ. संजय मं.गो., खजिनदार सुनील दिवेकर, सह खजिनदार अजय भोसले, सह सचिव अनुजा लोहार, मीनल उत्तुरकर, विश्वनाथ चांदोरकर, सीमा श्रीवास्तव यांनी चांगली मेहनत घेतली. संस्थेचा एकलव्य कार्यकर्ता पंकज गुरव आणि प्रकेत ठाकुर यांनी झूम तंत्रज्ञानाची धुरा सांभाळली. हा कार्यक्रम फेसबूकवर लाईव बघण्यासाठी मुंबईतून नाटककार मीना नाईक, निलेश मयेकर, पुणे येथून राजेंद्र बहाळकर, मयूरेश भडसावळे, डॉ. गिरीश साळगावकर, शीला वागळे, शरद कदम, यशवंत सोनुने (जालना), डॉ. गुलाबराव राजे (चिपळूण) , शुभांगी जोशी, अविनाश कदम, अविनाश मोकाशी, माधुरी पाटील, अमेरिकेहून विक्रांत कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.