ठाणे : बालरंगभूमीमुळे मला आत्मविश्वास मिळाला. माझ्यावर उत्तम संस्कार झाले. बालसहकलाकाराला कसे सांभाळून घ्यायचे, याची शिकवण मिळाली. संवाद पाठ केल्यामुळे पाठांतराचा उपयोग अभ्यासात झाला, एवढेच नव्हे तर, कितीही प्रसंग आले तरी शो मस्ट गो आॅन याचीही शिकवण मिळाली, असे नाना तºहेचे अनुभव चिमुकल्यांनी अंत:करणापासून व्यासपीठावर येऊन सांगून उपस्थितांना चकित केले. नाट्यकलेचा समावेश अभ्यासक्रमात करण्याची मागणीही त्यांनी केली.
सहा वर्षांच्या संस्कृती शेट्येने मनोगत व्यक्त करताना उपस्थितांना पोट धरून हसवले. माझे बालरंगभूमीविषयी अनुभव तुम्हाला आवडले नाही, तरी मी लहान असल्याने तुम्ही माझ्यावर रागावू शकत नाही, अशी ही चिमुकली म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. यावेळी मुलांचे पालकही आवर्जून उपस्थित होते. विशेष म्हणजे, बहुतांश मुले ही इंग्रजी माध्यमातील होती. त्यांनी मराठीतूनच बालनाट्याविषयीचे अनुभव सांगितले. मानस खराडे म्हणाला की, बालरंगभूमीवर बालनाट्य सादर करणे ही माझ्यासाठी आनंदाची पर्वणीच असते. नीरजा वडके म्हणाली की, मला मराठी भाषेचा अभिमान असून बालरंगभूमीमुळे कोणत्याही प्रसंगाला शांतचित्ताने सामोरे जाण्यास शिकवले. सोहम मोहिले म्हणाला की, अभिनय क्षेत्रात हा रंगमंच मला घडवू शकतो. यश कºहाडकर म्हणाला की, सुरुवातीला मी बालनाट्यात काम करताना घाबरायचो, आता माझी भीती पळून गेली आहे. स्वयम् जोशीने सांगितले की, नाटक हे शाळेतही शिकवले पाहिजे. इशिका खोल्लमने सांगितले की, बालनाट्यामुळे एकाच भाषेत बोलण्याची सवय लागते आणि टीमने काम करता येते. ऋतुजा पाटणकर म्हणाली, माझी आजी नाटकात काम करायची, पुढे तिला काम करता आले नाही. तिचे स्वप्न मी पूर्ण करत आहे. अर्णव पाटीलने सांगितले की, एकमेकांना सावरायला शिकलो. रुही बांधेकरने ही कला शिकल्याने शब्द संपत्ती वाढल्याचे कबूल केले. निलय परांजपेने आमच्या नाटकाला हाउसफुल्लचा बोर्ड लागावा म्हणजे आम्ही पण खूश आणि आमचे निर्मातेही खूश असे सांगत उपस्थितांना हसवले. सेशा हिंदळेकरने रंगभूमी म्हणजे सादरीकरण असे मत व्यक्त केले, तर आदित्य खोल्लमने छोट्यांची नाटके छोट्यांनीच करावी, अशी इच्छा व्यक्त केली. अदिती बेहेरेने मला टीव्ही, संगणकांपेक्षा बालनाट्य जास्त आवडू लागल्याचे सांगितले. नहुश वैद्यने नाटकात काम केल्याने नवीन मित्र मिळाल्याचे सांगितले. मकरंद इंगवले, हिमानी परब यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. मैत्रेय कुलकर्णी, तेजल बोबडे, अद्वेय देव आणि नीरजा शेठ यांनीही अनुभव कथन केले. शेवटी प्रा. बाळासाहेब खोल्लम आणि ‘लोकमत’च्या पत्रकार प्रज्ञा म्हात्रे यांच्या हस्ते बालकलाकारांना प्रशस्तीपत्रके देण्यात आली. यावेळी बालनाट्यचळवळीचे राजू तुलालवार व इतर उपस्थित होते.