ठाणे : श्रावण मासानिमित्त मंदिरात दर्शनाच्या नावाखाली आलेल्या एकाने चक्क देवाची दानपेटी फाेडून त्यावर डल्ला मारल्याचा प्रकार बुधवारी उघड झाला आहे. कोपरीतील हनुमान मंदिरात दिवसाढवळ्या घडलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी चाेरीचा गुन्हा दाखल झाला असून आराेपीचा शाेध घेण्यात येत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
ठाणे पूर्व कोपरी रेल्वे स्थानकासमाेरील साईनाथनगर येथील श्री पवनसुत हनुमान मंदिरातील दानपेटी २३ ऑगस्ट २०२३ सकाळी ८:३० च्या सुमारास चोरट्याने फोडली. सुमारे १० ते १५ हजारांची रोकड तसेच काही सुटी नाणी या चोरट्याने लांबवल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सीसीटीव्हीतील चित्रणानुसार बुधवारी सकाळी आधी हा चोरटा हनुमानाच्या चरणी नतमस्तक होऊन नंतर डुप्लिकेट चावीने दानपेटीचे कुलूप उघडताना दिसत आहे. त्यानंतर एक-दोन नव्हे, तर आठवेळा दानपेटीतील रक्कम सोबत आणलेल्या पिशवीत भरतानाही तो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. घटनास्थळी कोपरी पोलिसांनी धाव घेऊन या प्रकाराचा पंचनामा केला आहे. चोरीबाबत काही माहिती असल्यास कोपरी पोलिस ठाण्याला ०२२- २५३२३८०० येथे संपर्क करण्याचे आवाहन पाेलिसांनी केले आहे.