जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे शहर पोलिसांनी अलीकडेच चोरीस गेलेले ७०० पेक्षा अधिक मोबाइल संबंधित परत केले आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. ठाणे शहरात दिवसाला किमान दहा मोबाइलची चोरी रोज कोणत्या ना कोणत्या मार्गावर होत असते. छानछौकीचे जीवन जगण्यासाठी आणि नशा करण्यासाठी पैसे मिळविण्यासाठीच मोबाइलची जबरी चोरी केल्याचे आढळले आहे.
ठाण्यातील हरिदासनगर सेवा रस्त्याववरून जाणाऱ्या पादचाऱ्याचा मोबाइल हिसकावून पळ काढणाऱ्या त्रिकुटापैकी पवन गौड (२२) हा खाली पडला. त्याला नागरिकांच्या मदतीने राबोडी पोलिसांनी १५ जानेवारी, २०२३ राेजी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चोरीचा मोबाइलही मिळाला. त्याच्यापाठोपाठ विकास राजभर, संजय राजभर आणि किशमोहन गौड यांनाही अटक केली. त्यांच्याकडून ४६ मोबाइल आणि तीन मोटारसायकली असा सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल उपनिरीक्षक दीपक पाटील यांच्या पथकाने हस्तगत केला. चोरीनंतर हे टाेळके माेबाइलची विक्री करायचे. चाैघांवरही मोक्कांतर्गत कारवाई केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी सांगितले.
स्पाेर्ट्स बाइकचा वापर मोबाइलच्या चोरीनंतर सहज पळण्यासाठी स्पोर्ट्स बाइकचा वापर केला जाताे. असे चाेरटे नशेच्याही आहारी गेलेले असतात. त्यामुळे पळून जाताना पडण्याची, मार लागण्याची अशी कोणतीच भीती त्यांना नसते. यातून मोबाइल वापरणे हा उद्देश नसतो, तर त्याच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांवर छानछौकी आणि नशापाणी करणे हे उद्देश असल्याचे तपासात उघड झाले आहे.
सीईआयआर ॲपचा होतो उपयोगचाेरीनंतर माेबाइल फ्लाइट मोडवर टाकून लॉक तोडून डाटा नष्ट केला जाताे. पूर्वी मोबाइलची चोरी झाल्यास पोलिस उपायुक्तांच्या परवानगीने त्याच्या ट्रेसिंगची सात दिवसांची परवानगी असायची.
फोन चालूच झाला नाही, तर तो शोधणे अवघड व्हायचे. आता सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (सीईआयआर) या नव्या ॲपमुळे तक्रार करणे आणि शोधण्यातही चांगली मदत होते.त्यामुळे चोरीचा मोबाइल दहा महिन्यांनी सुरू झाला, तरी तो ट्रेसिंग केला जातो. त्यात दुसरा सिम टाकले, तरी त्याची माहिती मिळते, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिली.
...तर डेटाही मिळू शकतो परतचोरीनंतर अनेक वेळा त्याचा डाटा मिळण्याची शक्यता खूप कमी असते. तो पाहिजे असल्यास पोलिसांकडे तशी मागणी करावी लागते. पोलिस ते न्यायसहायक वैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवितात. शक्य झाल्यास एफएसएलचे तज्ज्ञ हा डाटा मिळविण्याचा प्रयत्न करतात. सुमारे तीन वर्षांचा कालावधी जातो.
मोबाइल न मिळण्याची ही आहेत कारणेचोरीनंतर माेबाइल चालू न करणे, तंत्रज्ञानाच्या वापरातून बनावट आयएमईआय क्रमांक टाकला जातो. त्यातील मुख्य हार्डवेअर काढून स्क्रीन, कॅमेरा आणि बॅटरी असे ट्रेस न होणाऱ्या सुट्या भागांची विक्री हाेते. चोरीची तक्रार नोंदविताना दोन आयएमईआय क्रमांक नोंदला गेला नाही तर तो ट्रेस करणे आव्हान असते. तक्रारच दिली नाहीतर तो मिळण्याची चिन्हे कमी असतात. ट्रेसिंगसाठी वरिष्ठांच्या परवानगी मिळविण्यातही तपास अधिकाऱ्यांचा बराच वेळ जातो.
परदेशातही विक्रीठाणे-मुंबईतून चोरलेल्या मोबाइलची उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात आणि छत्तीसगडला विक्री हाेते. मोबाइल ट्रेस झाल्यानंतर तो ज्याच्याकडे विक्री केला आहे, त्याला योग्य भाषेत सल्ला देऊन मोबाइल पोस्टाने पाठविण्यास सांगून तो परत मिळविला जाताे. आयफोनसारख्या महागड्या मोबाइलची पाकिस्तान, बांग्लादेश, सिंगापूर आणि चीनमध्ये ट्रेसेबल पार्ट काढून विक्री केली जाते.