मुरलीधर भवार, कल्याण कल्याणची आर्य गुरुकुल शाळा सजली होती. शाळेत खेळमेळा आयोजित करण्यात आला होता. ख्रिसमसची पूर्वसंध्या असल्याने वातावरण वेगळे होते. मेळा संपला. सगळी मुले शाळेच्या प्रांगणातून बाहेर पडत असताना शेजारीच असलेल्या फुगेवाल्याभोवती मुलांची गर्दी झाली. काही कळायच्या आत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. फुगेवालातर मरण पावलाच, पण घोळका केलेली मुले होरपळली. एकच हलकल्लोळ झाला. आनंद दु:खात परिवर्तित झाला. धावपळ उडाली. सारेच सुन्न झाले. कल्याण-हाजीमलंग रोडला आर्य गुरुकुल ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. तेथे कौशल सुधाकर पवार सीनिअर केजीत शिकतो. शाळेत खेळमेळा असल्याने त्याची आई दीप्ती आणि त्यांची भाची प्रियंका अशोक मोरे सोबतच गेले होते. कार्यक्रमाचा आनंद त्यांनी लुटला. निघताना हा सिलिंडरचा स्फोट झाला आणि प्रियंका मोरे गंभीर जखमी झाली. कौशलची आई दीप्ती यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. कौशलही जखमी झाला आहे. कौशलला उपचारासाठी डोंबिवलीच्या यश रुग्णालयात दाखल केले आहे. प्रियंकाचा चेहरा गंभीर स्वरूपात भाजला आहे. प्रियंका मोरे रामकृष्ण इमारतीत कल्याण पूर्वेतील चेतना नाक्यावर राहते. ती बिर्ला कॉलेजची विद्यार्र्थिनी आहे. घटना कळताच तिची आई अपर्णा यांनी मेट्रो रुग्णालयात धाव घेतली. प्रियंकाची परिस्थिती पाहून त्यांच्या संयमाचा बांध फुटला. तरुण मुलगी प्रियंका आणि बहीण दीप्ती यांना दुखापत झाल्याने अश्रूंना आवर घालणे अपर्णा यांना शक्य झाले नाही. कसे होणार माझ्या मुलीचे, ही चिंता त्यांना भेडसावते आहे. फुगा घेणे जीवावर बेतले?अंबरनाथमधील कानसई परिसरात राहणारे दामोदर पाटील यांचा मुलगा साई पाटील दुसरीत गुरुकुल शाळेत शिकतो. दामोदर मुलासोबत शाळेत आले होते. दामोदर या घटनेत २० टक्के भाजले आहेत. मुलगा साई याच्या छातीला व डोळ्याला दुखापत झाली आहे. त्याला यश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर दामोदर यांच्यावर मेट्रो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दामोदर यांचे मित्र श्रीकांत गुजर यांनी सांगितले, कार्यक्रम संपवून बापलेक शाळेबाहेर पडत होते. त्याच वेळी साई ‘बाबा, फुगा घेऊ’ असे सांगत फुगेवाल्याच्या दिशेने गेला. तो पोहोचेपर्यंत स्फोट झाला आणि दामोदर, साई जखमी झाले.सगळीकडेच आसू...उल्हासनगरच्या गजानननगरात राहणाऱ्या सिद्धी परब या लॅबमध्ये कामाला आहेत. त्यांचा लहान मुलगा सर्वेश गुरुकुल शाळेत शिकतो. सर्वेशसोबत त्या आणि त्यांचा मोठा मुलगा खेळमेळ्याला गेल्या होत्या. कार्यक्रम संपला तेव्हा सिद्धी बाहेर पडत होत्या. त्यांच्या आधी पवन आणि सर्वेश बाहेर पडले. तेवढ्यात, स्फोटाचा आवाज झाला आणि त्या मुलांकडे धावल्या. सर्वेशला काही झाले नाही, पण पवनच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली. दोघांना जे.जे.त हलविणारमेट्रो रुग्णालयातील डॉ. प्रवीण भुजबळ यांनी सांगितले, या घटनेत जखमी झालेल्या सात पालकांवर आमच्याकडे उपचार सुरू आहेत. त्यातील प्रियंका मोरे ही गंभीर जखमी आहे.तिच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. काही प्रमाणात प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल. प्रशांत चौधरी या पालकाच्या डोळ्याची दुखापत गंभीर आहे. प्रियंका मोरे व प्रशांत चौधरी यांना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.
... त्यांच्या आनंदाचा फुगा क्षणात फुटला!
By admin | Published: December 25, 2015 2:28 AM