ठाणे जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईची भीषण झळ पोहोचली आहे. सुरुवातील ३० टक्के असलेली पाणीटंचाई नंतर ४५ टक्के होताहोता आता ६० टक्क्यांंपर्यंत गेली आहे. मे महिन्याच्या मध्यावर अनेक धरणांतील पाणीसाठा पुरेल की नाही, अशी भीती होती. मात्र, शहरांच्या-उद्योगांच्या पाण्यात कपात करत पाणी कसेबसे पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान जपणाऱ्या ‘लोकमत’ने पाण्याची नासाडी न करता धूळवड साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत काही सोसायट्यांनी पहिले पाऊल उचलले आहे. आपल्यासह अनेक सुजाण वाचकांनी त्याचे अनुकरण करावे, असे आवाहन आम्ही करत आहोत...> केवळ एक टिळा चंदनाचाप्रज्ञा म्हात्रे ल्ल ठाणेमाजिवडा येथील लोढा लक्झरियस कॉम्प्लेक्सने यंदा भीषण पाणीटंचाई असल्याने धूळवड न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे आबालवृद्धांचे यावर एकमत आहे. एकमेकांच्या कपाळाला चंदनाचा टिळा लावून आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करून धूळवड साजरी करणार आहेत. गेल्या महिनाभरात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. संपूर्ण जिल्ह्याला हा प्रश्न भेडसावू लागला आहे. होळीच्या दिवशी पाण्याचा बेसुमार वापर केला जातो. यंदाची भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन पर्यावरण संस्थादेखील होळी न खेळण्याचे आवाहन करीत आहे. शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये यंदा होळी खेळावी किंवा कसे, यावर खल सुरू झाला आहे. त्याच वेळी ‘लोढा लक्झरियस’ने गेल्या एक आठवड्यात रंग न खेळण्याचा निर्णय घेऊन रहिवाशांमध्ये जनजागृती केली. कॉम्प्लेक्समधील कारंजे, स्विमिंगपूलदेखील बंद करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या कॉम्प्लेक्समधील लहान मुलांनीही समस्येचे गांभीर्य ओळखून स्वत:हूनच होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कोरडी होळी जरी खेळली तरी ते रंग धुण्यासाठी पाणी लागतेच, त्यापेक्षा चंदनाचा टिळा लावूनच होळी साजरी करणे, हाच योग्य मार्ग असण्यावर कॉम्प्लेक्सच्या बैठकीत एकमत झाले. याचा अर्थ होळी व धूळवडीचा आनंद आम्ही साजरा करणार नाही, असे नाही. त्याला पर्याय म्हणून गुरुवारी सर्व रहिवासी एकत्र येऊन खेळ, नृत्य, अॅरोबिक्स, जिम्नॅस्टिक्स, अॅथलेटिक्स व वेगवेगळ्या प्रांतांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे कार्यक्रम साजरे करणार आहोत, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.विशेष म्हणजे जलसंवर्धनाचा संदेश देणारे ३५ मुलांचा सहभाग असलेले ११ मिनिटांचे पथनाट्य बसवण्यात आले आहे. तसेच, कॉम्प्लेक्समधील दोन सोसायट्यांचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले असून त्याद्वारे धूळवड साजरी न करण्याचा मेसेज फिरवला जात आहे. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत हे कार्यक्रम होणार असून त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे. अर्थात, सर्व संकटांचा नाश व्हावा, याकरिता बुधवारी होळीचे आयोजन केले जाणार आहे, असे रहिवासी व पर्यावरणवादी उल्हास कार्ले यांनी सांगितले. > लोढा लक्झरियस कॉम्प्लेक्समध्ये ८४० फ्लॅट्स असून सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांनीही होळी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. होळी न खेळण्याची कारणे लहान मुलांना सहजपणे पटवून देता आली आणि त्यांनी स्वत:हूनच यासाठी पुढाकार घेतला. होळी साजरी करणार, पण ती सांस्कृतिक कार्यक्रमांनी. तसेच, प्रत्येक रहिवासी या वेळी शिस्त पाळणार आहे.- उल्हास कार्ले, रहिवासी व पर्यावरणवादी, लोढा लक्झरियस> या वेळी रंग आणि पाण्याचा वापर होळीच्या दिवशी करायचा नाही, असा निर्णय एकमताने घेतला आहे. लहान मुलांबरोबर महिलांनीही याला पाठिंबा दर्शवला आहे. यंदा कोरडी होळी खेळायलादेखील आमचा विरोध आहे. कारण, त्यासाठीदेखील पाणी लागते. - आभा टालेकर, सांस्कृतिक कमिटी सदस्य, लोढा लक्झरियस
त्यांची धूळवड पाण्याविना, तुमची?
By admin | Published: March 22, 2016 2:20 AM