ठाणे : थीम पार्क बैठकीत कामाच्या खर्चाच्या तपशिलाची कागदपत्रे महापौर मीनाक्षी शिंदे यांना वगळता कोणत्याही सदस्यांना न मिळाल्याने सदस्यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. ही कागदपत्रे त्वरित उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी यावेळी सदस्यांनी केली. दरम्यान, पाणीखात्यातील अधिकारी विश्वास ढोले यांची समिती सचिव म्हणून नियुक्ती केली. ढोले यांच्या नियुक्तीनंतर त्यांना सदस्यांना नस्ती उपलब्ध करून देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
घोडबंदर भागातील नवीन ठाणे, जुने ठाणे अर्थात थीम पार्कच्या मुद्यावरून ठामपा महासभेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर आगपाखड केली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता. त्यानंतर, जे सत्य बाहेर येईल, त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल, असाही निर्णय घेण्यात आला होता. या समितीची नवीन वर्षात महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत समितीच्या सदस्यांनी थीम पार्कच्या कामासंदर्भातील सर्व नस्ती सदस्यांना त्वरित उपलब्ध करून द्याव्यात. त्याशिवाय, चर्चा अशक्य असल्याचे सांगितले होते. त्यानुसार, बुधवारी पुन्हा झालेल्या बैठकीत केवळ महापौरांनाच या कामाची नस्ती उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर महापौरांच्या नस्तीच्या झेरॉक्स काढून त्या सदस्यांना वाटप करण्यात आल्या. त्यावर सदस्यांनी काही मुद्यांवर चर्चा केली, पण पुढील कागदपत्रे उपलब्ध झाल्यावरच सखोल चर्चा करू, अशी भूमिका सदस्यांनी घेतली. त्यानुसार, कागदपत्रे दिली जाणार आहे.समिती सदस्यांना नस्ती उपलब्ध करून देण्याचे आदेशया चौकशी समितीचा सचिव म्हणून पाणीखात्यातील अभियंता ढोले यांची नियुक्ती केली आहे. त्यांना सदस्यांना त्वरित नस्ती उपलब्ध करून देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे.उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृहनेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, नारायण पवार, मिलिंद पाटणकर, नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहीरराव उपस्थित होते.