कल्याण : केडीएमसीतर्फे सुरू असलेली रस्ते देखभाल-दुरुस्तीची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचे, डांबराचा वापर न करता खडी व मातीमध्ये खड्डे भरण्याचे कामे सुरू असल्याचे व यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हे आरोप चुकीचे आहेत. कोणतीही माहिती न घेता केलेले आहेत, असे निवेदन महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी (देवनपल्ली) यांनी जाहीर केले आहे. १० ते १५ आॅक्टोबरदरम्यान पावसाच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन सर्व प्रभागात डांबरीकरणाने रस्तेदुरु स्तीचे कामे सुरु करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.रस्त्यांच्या दुर्दशेबाबत गुरुवारी डोंबिवलीत मनसेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते. महापालिकेच्या वर्धापनदिनी अनोख्या पद्धतीने खड्ड्यात केडीएमसी मुख्यालयाची प्रतिकृती ठेवून आणि त्यासमोर केक कापून हे आंदोलन केले होते. यात मनसे पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. याचबरोबर प्रसारमाध्यमांमध्येही होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप पाहता महापालिकेच्या शहर अभियंता कोळी यांनी रविवारी निवेदन जाहीर करून आरोप फेटाळले आहेत. रस्तावरील खड्डे हे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरणाने, पावसाळ्याच्या कालावधीत खडीकरणाने कोल्ड मिक्सने व पावसाळ्यानंतर पुन्हा डांबरीकरणाने भरण्यात येतात. सर्वच महापालिका क्षेत्रात अशा प्रकारे कार्यवाही करण्यात येत असते. पावसाळ्याच्या कालावधीत डांबरीकरण केल्यास ते टिकत नाही व नाहक खर्च होऊ शकतो, असे कोळी यांनी त्यात म्हटले आहे.कामाची बिले दिलेली नाहीत!सध्या पावसाळा पूर्णपणे संपलेला नाही. या कालावधीत डांबरीकरण करणे तांत्रिकदृष्ट्या योग्य नसून खडीकरणाने व काही प्रमाणात कोल्ड मिक्सने सर्वत्र खड्डे भरण्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे महापालिका डांबराचा वापर न करता खडी व मातीने खड्डे भरते. लवकरच डांबरीकरणाची कामे सुरू करून सर्व रस्ते लवकरात लवकर सुस्थितीत आणण्यात येतील, असे कोळी यांनी निवेदनात म्हटले आहे. चालू वर्षातील खड्डे भरण्याच्या कामाची कोणतीही बिले अद्याप कंत्रटदारांना देण्यात आलेली नाहीत याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
...तर १० ऑक्टोबरपासून रस्त्यांचे डांबरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 11:57 PM