ठाणे : ठाण्यातील कोरोना बाधीत रुग्णांच्या ठिकाणी सोई सुविधांची वाणवा असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. भाईंदर पाडा येथे रुग्णांचे हाल सुरु आहेत, तसेच नवीन कोरोना केअर सेंटरमध्ये डॉक्टर, नर्सेसची संख्या कमी असल्याचेही निदर्शनास आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या परिस्थितीत येत्या 8 दिवसात सुधारणा झाली नाही, किंवा रुग्णांना योग्य त्या सुविधा मिळाल्या नाही तर भाजपा रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
दरेकर यांनी गुरुवारी भाईंदरपाडा येथील क्वॉरन्टाइन सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे ठाणो शहर अध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर तसेच भाजपचे स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. यावेळी त्यांनी येथील सोई सुविधांची, त्या ठिकाणी काय काय उणिवा याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी नव्याने तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या कोवीड सेंटरची पाहणी करुन येथील डॉक्टर, नर्सेस यांच्या बरोबर चर्चा केली. यावेळी या सेंटरमध्ये डॉक्टरांची व नर्सेसची संख्या अपुरी असल्याचे डॉक्टरांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच इतर साहित्याचीही कमतरता असल्याचेही त्यांनी दरेकर यांना सांगितले. परंतु यामध्ये सुधारणा होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. या भेटीनंतर त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान त्यांनी केलेल्या या भेटीदरम्यान काय काय उणिवा निदर्शनास आल्या, त्याचा पाढा आयुक्तांपुढे वाचला. तसेच यात सुधारणा करण्याचे आदेशही त्यांनी दिले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलतांना याची माहिती दिली. जवाहरबाग स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी पाच ते सहा तास थांबावे लागत आहे, इतर स्मशानभुमीत सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर येत्या आठ दिवसात या व्यवस्थेत सुधारणा झाल्या नाही तर भाजप यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन उभे करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
खाजगी रुग्णालयाकडूनही सर्वच ठिकाणी लुट सुरु आहे, या विरोधात भाजपच्या माध्यमातून मुंबईत आंदोलन करण्यात आली आहेत. तसाच प्रकार ठाण्यात सुरु आहे, खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांची लुट सुरु आहे. परंतु यावर कंट्रोल आला नाही, तर उद्या आमचा कंट्रोल निघून जाईल आणि आमचा आक्रमकपणा थांबवणो शक्य होणार नाही. त्यामुळे कायद्याने ज्या पध्दतीने तुम्हाला अधिकार दिले आहेत. त्यानुसार योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. तसेच अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांवर, डॉक्टरांवर कारवाई करावी असेही त्यांनी सांगितले. तसेच रुग्णांची लुट होणार नाही यासाठी भाजप प्रयत्न करेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोरोनासाठी उभारण्यात आलेल्या रुग्णालयात डॉक्टर, नर्सेस, इतर कर्मचारी वर्ग असेल त्यांना न्याय मिळाला पाहिजे, योग्य ते मानधन दिले गेले पाहिजे, असे आमचेही मत आहे. परंतु येथील कंनस्टलन्ट पाच ते सात लाख मागत असेल तर ते चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे येथे सेवा देत असलेल्या डॉक्टर, नर्सेस यांच्या सेवेलाही यामुळे डाग लागणार आहे. त्यामुळे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जितो सारखी सेवाभावी संस्था सेवाच्या आडून मागे काही तरी लपवत तर नाही ना? याचाही शोध घेणो प्रशासनाचे काम असल्याचे त्यांनी सांगितले.