ठाणे : मुंब्रा भागात काही समाजकंटकांमुळे डॉक्टरांकडून मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यात येत नाही. त्यामुळे मृतदेह घरात झाकून ठेवत नातलगांना मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वणवण करावी लागते. हा प्रकार ठाणे महापालिकेच्या अनास्थेमुळे होत असल्याचा आरोप मुंब्रा-कौसा भागातील नागरिकांकडून केला जात आहे. ही समस्या ठामपा प्रशासनाने तत्काळ सोडवावी. अन्यथा, यापुढे मृतदेह घेऊन ठामपा मुख्यालयाच्या दारात उभा राहीन, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अश्रफ (शानू) पठाण यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये दिला.
स्थायी समितीची बैठक शुक्र वारी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आयोजित केली होती. यावेळी शानू पठाण यांनी मुंब्रा भागात मयत झालेल्यांना मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यास तेथील डॉक्टरांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा मुद्दा चर्चेला आणला. मुंब्य्रातील काही समाजकंटकांकडून माहिती अधिकार कायद्याचा दुरु पयोग करून डॉक्टरांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील डॉक्टर नैसर्गिक मृत्यू झालेल्यांना प्रमाणपत्र देण्यास चक्क नकार देत आहेत. परिणामी, ज्यांच्या घरात दु:खाचा डोंगर कोसळलेला असतो, अशा लोकांनाही मृत्यूचे प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे मृतदेह घरातच ठेवून डॉक्टरांची शोधाशोध करावी लागते. काही वेळा तर हजारो रु पये मोजून हे प्रमाणपत्र मिळवावे लागते. या प्रकाराला ठामपाचे आरोग्य खाते जबाबदार असल्याची तक्र ार मुंब्य्रातील नागरिक करीत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी सभापती राम रेपाळे यांनी ही समस्या तत्काळ निकाली काढण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे.अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे म्हणाले की, आरोग्य अधिकारी डॉ. वाळवीकर आणि मुंब्रा-कौसा येथील डॉक्टरांची बैठक पुढील आठवड्यात बोलवण्यात येणार आहे. या डॉक्टरांना पालिकेच्या वतीने मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आदेश देण्यात येतील.