...तर जिल्ह्यातील काँग्रेस अध्यक्षांची होणार उचलबांगडी; नाना पटोले यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 11:26 PM2021-02-25T23:26:07+5:302021-02-25T23:26:29+5:30
नाना पटोले यांचा इशारा : ठाणे जिल्ह्यात पक्ष कमकुवत
अजित मांडके
ठाणे : ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पूर्णपणे कमकुवत झालेली आहे. त्यामुळे आगामी काळात विधानसभा, लोकसभा अथवा महापालिकांच्या निवडणुका लढवायच्या असतील तर सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. याची जबाबदारी तेथील अध्यक्षांवर असणार आहे. परंतु, त्यांच्याकडून काम योग्य झाले नाही, तर त्यांची उचलबांगडी केली जाईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. ‘लढाई हौसले से लढी जाती है.. हत्यारों से नहीं’ असे सांगून त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पटोले राज्यातील विविध जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकी घेत आहेत. त्यानुसार बुधवारी सायंकाळी उशिरा ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली होती. या बैठकीला ठाणे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे, प्रदेश सदस्य राजेश जाधव, नईम खान, महेंद्र म्हात्रे, शिल्पा सोनाने, शिरीष घरत, शेखर पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी ठाणे जिल्ह्यात काँग्रेस कमकुवत असल्याची खंत पटोले यांनी व्यक्त केली. परंतु, ठाणे शहरात काँग्रेसचे काम हे बऱ्यापैकी सुरू असल्याने त्यानुसार जिल्ह्यातील इतर ठिकाणीदेखील अशी बांधणी गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाणे शहर काँग्रेसला बळकटी द्या
ठाण्याबाबत आता गटातटाचे राजकारण आता संपले असले तरी काँग्रेसचे श्रेष्ठी सांगतील त्यानुसार शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलने असतील किंवा इतर कामांमध्ये कार्यकर्त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. मात्र, ठाणे शहर काँग्रेसला श्रेष्ठींकडून बळकटी मिळत नसल्याची खंत या वेळी काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
पक्षाने ३८ वर्षे आम्हाला काहीच दिले नाही, ना तलवार दिली, ना ढाल, ना बळ दिले आणि लढ म्हणतात. अशा परिस्थितीत आम्ही कसे लढायचे, असा सवाल काही पदाधिकाऱ्यांना यावेळी तळमळीने केला. इतर पक्षातील मंडळी काँग्रेसच्या जीवावर मोठी झाली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.