मीरा रोड : मीरा-भार्इंदरचा सुधारित प्रारूप विकास आराखडा फुटल्याने त्या आधारे जमीन खरेदीत अर्थपूर्ण संबंधांचे आरोप होत असतानाच मंगळवारच्या विशेष महासभेत सत्ताधारी भाजपाने हा आराखडा आयुक्तांनी पुढील महासभेत जाहीर करण्याचा ठराव केला. तसेच हा नकाशा फुटल्याप्रकरणी चौकशी करून संबंधित जबाबदार व्यक्तीवर किंवा बातमी खोटी असल्यास बातमी प्रसिध्द करणाºया पत्रकारांवर गुन्हा दाखल करावा, असे त्यात म्हटले आहे. विशेष म्हणजे माजी महापौर गीता जैन यांनी तटस्थ रहात भाजपाला घरचा आहेर दिला. आयुक्तांनी मात्र नकाशा अजून बंद लिफाफ्यात आहे. फुटीप्रकरणी कोणी दोषी आढळल्यास कारवाई करू, असे संकेत त्यांनी दिले.प्रारूप विकास आराखडा फुटल्याची तक्रार, कथितरित्या त्याची व्हायरल झालेली पाने यामुळे मीरा-भार्इंदरसह पालिका व सत्ताधारी वर्तुळात खळबळ उडाली. परिणामी मंगळवारच्या विशेष महासभेत घाईगडबडीत सत्ताधाºयांनी सुधारित विकास योजनेवर चर्चा करण्याचा विषय आणला. हा विषय प्रशासनाने दिला नसल्याने त्याचा गोषवारा नव्हता, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.प्रारुप विकास योजनेवरील राजकीय प्रभावाची चर्चा आधीपासूनच रंगली होती. तत्कालीन आयुक्त डॉ. नरेश गीते यांना सत्ताधारी भाजपाकडून लक्ष्य करण्यामागेही आयुक्तांनी सुधारित योजनेची फेरपडताळणी करण्याचा पवित्रा घेतल्याचे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात होते.महसभेत सत्ताधारी भाजपाने बहुमताने ठराव करत येणाºया महासभेत प्रारूप विकास आराखडा सविस्तर माहितीसह सादर करण्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर आराखडा फुटी प्रकरणी आयुक्तांनी चौकशी करून ते नकाशाचे पान आराखड्याचे असेल, तर जबाबदार व्यक्तीवर कारवाई करावी. जर ते पान आराखड्यातले नसेल तर बातमी प्रसिध्द करणाºयावर गुन्हा दाखल करावा, असेही भाजपाच्या ठरावात नमूद केले आहे.या विषयावर मतदान झाले असता भाजपाच्या माजी महापौर गीता जैन तटस्थ राहिल्या. अधिकाºयांना त्यांचे काम करु द्या, असे त्या म्हणाल्या. ठरावावर बोलताना आयुक्तांनी जे काम नियमाप्रमाणे आहे ते करीन, असे स्पष्ट करत प्रारूप नकाशाचा लिफाफा अजून बंद आहे. कोकण विभागीय नगररचना संचालकांकडे १४ फेब्रुवारीलाच मार्गदर्शन करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. पण त्याबद्दलचे मार्गदर्शन अजून मिळालेले नसल्याचे सांगितले.
... तर पत्रकारांवरही गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:58 AM