ठाणे: जामीन मिळण्यासाठी थेट न्यायसंस्थेलाच आव्हान देऊन कारागृहात उपोषण करणाºया हरिश्चंद्र शुक्ला या कैद्याविरुद्ध लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती कारागृह सूत्रांनी दिली. दरम्यान, प्रकृती खालावल्यामुळे आता त्याच्यावर कारागृहातच उपचार करण्यात येत आहेत.
आपल्यावरील आरोप खोटा असल्याचा दावा करून २ सप्टेंबरपासून त्याने उपोषण सुरू केले आहे. या उपोषणादरम्यान ७ सप्टेंबर रोजी ठाणे कारागृहात नियमित भेटीसाठी आलेले ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांनीही त्याची भेट घेऊन विचारपूस केली होती. त्यानंतर त्यांनी त्याच्याविरुद्धचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचे आश्वासनही त्याला दिले होते. त्यानंतरही त्याने उपोषण मागे घेतले नाही. सोमवारी (१८ सप्टेंबर रोजी) त्याची पुन्हा कारागृह प्रशासनाच्या वतीने अधीक्षक नितिन वायचळ यांनी समजूत काढली. उपोषणाच्या दरम्यान त्याची प्रकृती ढासळल्याने ग्लूकोज लावून त्याच्यावर कारागृहातच उपचार करण्यात येत आहेत. अर्थात, त्याने हट्टीपणा सोडला नाहीतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुळात, या कैद्याचे उपोषण न्यायसंस्था आणि पोलीस या यंत्रणेविरुद्ध आहे. त्याने कारागृहात उपोषण केल्यामुळे यंत्रणेचा बराच वेळ त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी खर्च करावा लागत आहे. ठाणे कारागृहात सुमारे तीन हजार ५०० कैदी असून या प्रत्येकाची गाºहाणीच कारागृहाच्या प्रशासनाने ऐकण्याचे ठरविले तरी त्यात नाहक वेळ खर्ची होणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या स्वतंत्र यंत्रणा असतांनाही या कैद्याच्या हट्टामुळे कारागृह अधिका-यांची यात चांगलीच कसरत होत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले.