कल्याण : वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यात रिक्षांचे प्रमाण लक्षणीय असून वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन कोंडीत भर पडत आहे. रिक्षा परवाना घ्यायचा आणि दुसरा व्यवसाय करायचा, असेही महाभाग असल्याने अशांच्या रिक्षा चालविण्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यांच्याकडून मनमानी भाडे आकारणी, उद्धट व उर्मट वागणूक प्रवाशांना दिली जात आहे. कल्याणमध्ये शनिवारी रात्री घडलेल्या छेडछाडीच्या प्रकरणावरून आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी बोध घेत बेकायदा रिक्षा चालविणाऱ्या १५ ते १६ वर्षांच्या मुलांकडेही वेळीच लक्ष देऊन त्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा रिक्षाचालकांकडून टवाळखोरीचे, गैरवर्तवणुकीचे घडणारे प्रकार यापुढेही सुरूच राहतील, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
परवाना आणि बॅच असलेल्या व्यक्तीलाच रिक्षा चालवता येते. परंतु, काही रिक्षाचालक ज्याच्याकडे बॅच आणि परवाना नाही, अशांना रिक्षा चालवायला देत आहेत. यात १५ ते १६ वर्षांची अल्पवयीन मुले सर्रासपणे रिक्षा चालविताना दिसत आहेत. अशांकडे गणवेश नसतोच. त्याचबरोबर बर्मुडा, हाफ पॅन्ट अशा पेहरावात ते रिक्षा चालवतात. तसेच स्टॅण्ड सोडून इतर ठिकाणांहून ते भाडे घेतात. गुटखा, माव्याने तोंडाचा तोबरा भरलेला असतो. काही वेळा मद्यपान, चरस आणि गांजाचे व्यसनही त्यांनी केलेले असते. उद्धट, उर्मट वागणूक, त्याचबरोबर मनमानी भाडे आकारणी ते करत असल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी पाहावयास मिळत आहे. त्यांच्या अशा वर्तणुकीमुळे सर्वसामान्य प्रामाणिक रिक्षाचालक भरडला जात असून, यात रिक्षा व्यवसायही एकप्रकारे बदनाम होत चालला आहे.
प्रवास बनलाय धोकादायक
अल्पवयीन मुलांच्या हातात रिक्षाचे स्टेअरिंग गेल्याने रिक्षाचा प्रवासही धोकादायक बनला आहे. अशा टवाळखोर रिक्षाचालकांकडून प्रवाशाचे अपहरण करणे, त्यांना लुबाडणे, पोलिसांशी हुज्जत घालणे, फरफटत नेणे आदी प्रकारही याआधीही घडले आहेत. अशा प्रवृत्तीला आळा घालण्याऐवजी त्याकडे आरटीओ आणि वाहतूक शाखेकडून पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
----------