लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शहराच्या पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर पूल उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पावसाने उघडीप दिली, तर या पुलाचे राहिलेले डांबरीकरण आणि रंगरंगोटीचे काम मार्गी लावून गणेशोत्सवापूर्वीच तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे केडीएमसीच्या शहर अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे वाहतूककोंडीतून लवकरच वाहनचालकांची सुटका होणार आहे.
कोपर उड्डाणपूल कमकुवत झाल्याने सप्टेंबर २०१९ मध्ये तातडीने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. हा पूल पाडून तेथे नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे. जूनमध्ये पूल बांधणीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले होते; परंतु अद्याप या पुलाचे काम मार्गी लागलेले नाही. त्यामुळे गेले दोन वर्षांपासून ठाकुर्ली पुलावरून वाहनांना पूर्व-पश्चिम ये-जा करावी लागत आहे.
सध्या पावसामुळे ठाकुर्ली पश्चिमेकडील भागातील पुलाच्या ठिकाणी खड्डे पडल्याने येथील वाहतूक काही दिवसांपासून मंदावली होती. वाहनचालकांना कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. रविवारी रक्षाबंधनाच्या दिवशी तर वाहतूककोंडीचा प्रचंड त्रास वाहनचालकांना सहन करावा लागला होता. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त सोमवारी प्रकाशित केल्यानंतर जाग आलेल्या मनपाने येथे डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे. मात्र, ठाकुर्ली पुलावर वाहनांचा वाढलेला ताण पाहता कोपर उड्डाणपूल कधी सुरू होईल, असा सवाल सर्व जण करत आहेत; परंतु पूल सुरू होण्याची प्रतीक्षा आता लवकरच संपुष्टात येणार आहे.
पावसावर कामाचे स्वरूप अवलंबून
कोपर पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून तो गणेश चतुर्थीला सुरू करण्यात येईल, असे वक्तव्य कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रसार माध्यमांसमोर नुकतेच केले आहे. त्यातच पुलाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगताना पावसाने उघडीप दिली तर बाकी राहिलेले डांबरीकरण आणि रंगरंगोटीचे काम लवकरात लवकर मार्गी लावून पूल गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच खुला करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असा दावा केडीएमसीच्या शहर अभियंता सपना देवनपल्ली- कोळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. पावसाने उघडीप दिली तर बाकी राहिलेले डांबरीकरण आणि रंगरंगोटीचे काम बुधवारपासून सुरू केले जाईल, याकडेही कोळी यांनी लक्ष वेधले.
----------------------