कल्याण : शहरातील पूर्व भागात सोयीसुविधांची वानवा आहे. याविषयी वारंवार आवाज उठवूनही त्याची दखल महापालिका प्रशासनाने घेतलेली नाही. २७ गावे महापालिकेत आल्यापासून नागरी सुविधांवर ताण आला आहे. ही गावे पुन्हा महापालिकेतून वगळण्याची मागणी होत आहे. त्याच धर्तीवर कल्याण पूर्वेच्या नागरिकांना सोयीसुविधाच मिळणार नसतील, तर या भागालाही महापालिकेतून वगळावे, अशी मागणी सत्ताधारी शिवसेना नगरसेवक निलेश शिंदे यांनी केली आहे.कल्याण पूर्वेत बेकायदा बांधकामे, कचरा आणि रस्ते विकासाचा प्रश्न आहे. प्रत्येक प्रभागात पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीची कामे दरवर्षी केली जातात. महापालिका आर्थिककोंडीत सापडली असल्याने एकाही विकासकामांच्या फायलीला मंजुरी दिली जात नाही. केडीएमसीच्या गुरुवारच्या महासभेत महापालिकेच्या आर्थिक स्थितीविषयी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करण्यात आली. महापालिकेवर ही वेळ का आली, असा प्रश्न शिंदे यांनी केला.प्रभागातील पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीची कामेच झालेली नाहीत. त्यामुळेच येथील पाणीपुरवठ्याची समस्या आहे. देखभालीअभावी हजारो लीटर पाणी वाया जात आहे. मात्र, प्रशासनाला त्याचे गांभीर्य नाही. प्रत्येक प्रभागात पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीची कामे करण्यावर किमान ३५ लाखांचा खर्च दरवर्षी होतो. यंदाच्या वर्षी आर्थिककोंडीमुळे खर्चाला कात्री लावली असावी, असे समजून किमान दोन लाख खर्चून देखभाल दुरुस्ती केली असली, तरीही कल्याण पूर्वेतील २५ प्रभागांत किमान अडीच कोटी रुपये इतकाच खर्च करावा लागला असता. हा खर्च करण्याची तयारीही प्रशासनाकडून दाखवली जात नाही, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.तत्कालीन महापौर कल्याण पाटील यांच्या काळात ‘यू’ टाइप कल्याण पूर्वेतील रस्ता विकसित करण्याचे काम कोणार्क कंपनीला दिले आहे. त्यावर किमान १२ कोटी खर्च होणार आहे. पाटील यांच्या महापौरपदाचा कालावधी संपला. त्यानंतर, दोन वर्षांपासून महापौरपदी राजेंद्र देवळेकर आहेत. साडेतीन वर्षे होऊनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. काटेमानिवली, गणपती मंदिर, तिसगावनाका हा ‘यू’ टाइप रस्ते व त्याशेजारी गटारे बांधण्यासाठी खोदला आहे. हे काम कधी होईल. रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात रिक्षाचालक बंद पुकारण्याच्या तयारीत आहेत.रस्त्यांची कामे रखडल्याने कंत्राटदाराविरोधात महापालिकेने काय कारवाई केली, त्याचा पत्ता नाही. खड्डे बुजवण्याचे कंत्राट जूनमध्ये काढण्यात काय मतलब आहे. पावसाळ्यात खड्डे बुजवू देणार नाही, असा पवित्रा आयुक्त पी. वेलारासू यांनी घेतला. खड्डे भरण्याचे कंत्राट हे मार्च किंवा एप्रिलमध्ये काढले पाहिजे. त्याच्या कामाला सुरुवात होऊन ते मे अखेरीस पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले पाहिजे. आपल्याकडे सगळ्याच बाबतीत उलटी गंगा वाहते. या सगळ्या प्रक्रियेत कल्याण पूर्वेतील साडेतीन लाखांची लोकसंख्या भरडली जात आहे. नागरी सुविधाच मिळणार नसतील, तर कल्याण पूर्व महापालिकेतून वेगळे करण्याची आग्रही मागणी नगरसेवक शिंदे यांनी केली आहे. दरम्यान, यामुळे शिवसेनेला हा घरचाआहेर आहे.
...तर कल्याण पूर्वेला वगळा, सत्ताधारी शिवसेनेला घरचा आहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 1:00 AM