ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कितीही पळ काढला, तरी राफेल प्रकरणाचे भूत त्यांच्या मानगुटीवरून उतरणार नाही. राफेलमध्ये घोटाळा झाला असून तो देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. या घोटाळ्याची चौकशी झाल्यास भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची नार्को टेस्टही करावी लागेल, असे मत काँग्रेस प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी ठाण्यात बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.राफेल विमानखरेदी प्रकरणात दोन राष्टÑपतींमध्ये काय चर्चा झाली, याचे उत्तर मोदींना द्यावे लागणार आहे. तेही संसदीय समितीसमोर येऊनच द्यावे लागेल. तसेच चौकीदाराला शासन झाल्याशिवायही राहणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.काँगे्रस आक्रमकराफेलप्रकरणी काँग्रेस पक्ष सध्या आक्रमक झाला आहे. या पत्रकार परिषदेत काँग्रेसने राफेल विमानाची किंमत, सरकारी तिजोरीचे ४१ हजार २०५ कोटींचे नुकसान, ३९ हजार कोटींचे आॅफसेट कंत्राट हिंदुस्थान एअरोनॉटिक्सला डावलून अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीला दिले. यासारखे एकूण सात प्रश्न यावेळी करून नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला लक्ष्य केले. यावेळी पुढे बोलताना सावंत यांनी मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात खोटी माहिती देऊन व असत्य बोलून न्यायालयाची दिशाभूल तर केली आहे. सोबत, संसदेच्या विशेष अधिकाराचेही उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मोदी हे अनिल अंबानी यांच्यासाठी राफेलसंदर्भात मध्यस्थी करताना पकडले गेले आहेत, असा आरोप फ्रान्सच्या पूर्व राष्टÑाध्यक्षांनी केला आहे. यामुळे आंतरराष्टÑीय पातळीवर आपल्या देशाची मान मोदींनी खाली घालायला लावली आहे. या देशावर झालेले आरोप आणि पंतप्रधान भ्रष्टाचारी आहे. यासारखे फ्रान्सचे पूर्व राष्टÑाध्यक्षांनी आरोप केले होते. त्यासंदर्भात काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रश्न विचारून उत्तर देण्याची संधी मोदींना दिली होती. मात्र, गेल्या तीन वर्षांत मोदींनी राफेल प्रकरणात ‘ब्र’देखील काढला नसल्याचे सावंत म्हणाले.संसदीय समितीसमोर पितळ उघडे पडणारसंसदीय समितीच्या चौकशीमध्ये मोदींचे पितळ उघडे पडणार आहे. तेव्हा त्यांचे चेहरे उघड होतीलच, तसेच घरघर मोदींचा नारा देणारे आता डरडर आणि थरथर मोदी झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. चुकीचे प्रतिज्ञापत्र दाखल करून सर्वोच्च न्यायालयाचाही अवमान केला आहे. देशातील जनतेप्रमाणे मोदी सरकार न्यायालयाला थोपवत आहे. मोदी यांना जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होईल, यासाठी राफेल घोटाळा प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी येत्या काळात जनतेत जाऊन त्याचा पाठपुरावा करणे, प्रबोधन करणे,आंदोलन करणे याद्वारे काँग्रेस पक्ष कार्यरत राहील, असे त्यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेत काँग्रेस ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे, राम भोसले, सदानंद भोसले, बी.एन. सिंग, रवींद्र आंग्रे, महेंद्र म्हात्रे, रमेश इंदिसे, जे.बी. यादव आदी उपस्थित होते.