ठाणे : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर आलेल्या स्थगितीसंदर्भात कुचकामी ठरलेल्या आघाडी सरकारविरोधात रविवारी सकल मराठा समाजाने संताप व्यक्त करीत, वेळप्रसंगी कोरोनाचे संकट झुगारून रस्त्यावर संघर्ष करण्याचा इशारा दिला. ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीला समन्वयक रमेश आंब्रे, कैलाश म्हापदी (प्रवक्ते), तसेच कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.सरकारने आरक्षणावर आलेल्या स्थगितीसंदर्भात चार दिवसांत निर्णय घेतला नाही, तर समाज रस्त्यावर उतरेल, असा अल्टीमेटम देतानाच समाजाने सरकार, शिक्षणमंत्री आणि महाअधिवक्ता कुंभकोणी यांचा धिक्कार केला. गेल्या वेळी एक दिवसाच्या अधिवेशनाचा आग्रह धरणारे उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री आहेत. ते अधिवेशन आता त्यांनी घेतले नाही, तर समाज त्यांना माफ करणार नाही, असे मोर्चाचे समन्वयक कैलाश म्हापदी यांनी नमूद केले.नवी मुंबईत मराठा समाजाचे बुधवारी आंदोलन1 मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज हवालदिल झाला आहे.या विरोधात नवी मुंबईत बुधवारी, १६ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाशीमधील माथाडी भवन येथे मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली.राज्य सरकारने वेळकाढूपणा आणि दुर्लक्ष केल्याने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने भविष्य अंधारात गेले असून, गांधी मार्गाने काही मिळत नसल्यास रस्त्यावर उतरावे लागणार असल्याचे सांगण्यात आले.मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चा नवी मुंबईची पुन्हा बैठक होणार असून, आंदोलनाची रूपरेषा ठरवली जाणार असल्याचे माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक अंकुश कदम, माजी नगरसेविका भारती पाटील, जिल्हा समन्वयक राहुल गावडे आदी उपस्थित होते.