अंबरनाथ : अंबरनाथच्या डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा हा गंभीर होत आहे. डम्पिंग ग्राउंड स्थलांतरित करण्याच्या मागणीवरून संघर्ष समितीने पालिकेला ३० जानेवारीची मुदत दिली आहे. तोपर्यंत डंपिंग स्थलांतरित न झाल्यास घंटागाड्या अडविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अंबरनाथ नगरपालिकेने डम्पिंगसाठी भविष्याची तरतूद म्हणून अंबरनाथ, बदलापूरचा संयुक्त घनकचरा प्रकल्प राबवण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरू आहेत. मात्र भविष्यात घनकचरा प्रकल्प उभा राहणार असला तरी, मोरीवली येथे सध्या सुरू असलेले डम्पिंग तत्काळ स्थलांतरित करण्यासाठी पालिकेवर दबाव वाढत आहेत. त्यात नवीन घनकचरा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत तात्पुरते डम्पिंग स्थलांतरित करण्यासाठी नगरपालिका जागेचा शोध घेत आहे. त्यालाही लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा विरोध होत आहे. त्यामुळे डम्पिंगच्या मुद्द्यावर आधीच अडचणीत असलेल्या नगरपालिकेच्या अडचणीत संयुक्त संघर्ष समितीने भर टाकली आहे. रविवारी सायंकाळी संघर्ष समितीकडून डम्पिंग स्थलांतरित करण्याबाबत फलकबाजी करण्यात आली.
१५ दिवसांपूर्वी संघर्ष समितीने डम्पिंग हटवण्याबाबत पालिका अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यामुळे ३० जानेवारीनंतर या अतिक्रमण केलेल्या जागेवर कचरा टाकण्यास समितीकडून विरोध केला जाणार असल्याचा इशारा फलकातून देण्यात आला आहे. तसेच पालिकेने डम्पिंग न हटवल्यास समितीकडून आक्रोश मोर्चाही काढला जाणार असल्याचा इशारा दिला आहे.
मोरीवली येथील डम्पिंग हटवण्याबाबत पालिकेद्वारे योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र पालिकेच्या प्रक्रियेला लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी सातत्याने अडथळा निर्माण न करता सहकार्य केल्यास हा प्रश्न सुटेल. - डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ