कल्याण : काटेमानिवलीनाका ते गणपती मंदिर ते पोटे अपार्टमेंट ते तिसगावनाका या यू टाइप रस्त्याचे रुंदीकरण अनेक वर्षांपासून रखडले आहे. या कामासाठी बुधवारपासून केडीएमसी प्रशासनाने सर्वेक्षण सुरू केले. पण, मोजणी अधिकाऱ्यांना रोखत पुनर्वसनाचा प्रश्न सोडवला जात नाही, तोपर्यंत कोणतेही काम करू दिले जाणार नाही. या रस्त्याच्या तीन वेळा झालेल्या रुंदीकरणात बाधित झालेल्यांचे आधी पुनर्वसन करा, अन्यथा तुमच्या मालमत्तांचा ताबा घेऊ, असा इशारा पुनर्वसन कृती समितीतर्फे देण्यात आला आहे.
काटेमानिवलीनाका, कोळसेवाडी, गणपती मंदिर चौक, सिद्धार्थनगर, म्हसोबा चौक ते तिसगावनाका या यू टाइप रस्त्याचे रुंदीकरण अनेक वर्षे अपूर्ण आहे. दरम्यान, बुधवारी हे काम केडीएमसीने सुरू केले होते. परंतु, पुनर्वसन धोरण न ठरवताच काम सुरू केल्याने स्थानिक नागरिकांच्या रोषाला मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाºयांना सामोरे जावे लागले होते. या रुंदीकरणात मोठा भ्रष्टाचार असून भूमाफियांना जादा एफएसआय मिळण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप कृती समितीने केला आहे. या रस्त्याचे २००० ते २०१७ या कालावधीत तीनदा रुंदीकरण झाले आहे. यामध्ये बाधित झालेल्या १६ जणांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. काही जणांना पुनर्वसनाचे आश्वासन दिले आणि सर्व्हे केला; मात्र पुढे काहीच झाले नाही.
बेघर रहिवासी महापालिकेत दोन वर्षांपासून खेपा घालत आहेत. याबाबत संबंधित बाधितांचे तत्काळ पुनर्वसन करा, अन्यथा तुमच्या मालमत्तांचा ताबा घेऊ, असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष उदय रसाळ यांनी केडीएमसीला दिला आहे.अन्यथा निषेध मोर्चा काढण्यात येईलच्यू टाइप रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्यांचे पुनर्वसन करा, तसेच रहिवासी व दुकानदार यांना भीती घालणे न थांबवल्यास १८ जानेवारीला केडीएमसी मुख्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येईल, असे पत्र आयुक्त गोविंद बोडके यांना कृती समितीने दिले आहे.च्रस्त्यावरील फेरीवाले तसेच बेकायदा वाहन पार्किंगवर कारवाई करण्याची मागणीही आयुक्तांकडे करण्यात आली आहे. बोडके यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.