ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यामुळेच भारताची आर्थिक स्थिती मजबूत झाली, अन्यथा भारताची स्थिती श्रीलंका, बांगलादेशप्रमाणे झाली असती, असे मत राज्याचे कौशल्य विकास व पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
मोदी@९ अंतर्गत भाजपतर्फे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या संयुक्त मोर्चा संमेलनात तसेच लाभार्थी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. पंतप्रधान मोदी सरकारने सुरू केलेल्या योजनांत आतापर्यंत २० कोटी नागरिक लाभार्थी झाले आहेत. त्यांच्या जीवनात बदल घडविण्याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदींनाच असल्याचे प्रतिपादन लोढा यांनी केले.
पंतप्रधान मोदी हे राष्ट्रप्रेम व अध्यात्म प्रेमाने भारलेले व्यक्तिमत्त्व आहे. जगातील अव्वल पाच राष्ट्रांत भारताची अर्थव्यवस्था पोहाेचवली. मजबूत अर्थव्यवस्थेमुळेच भारताची आर्थिक स्थिती श्रीलंका व बांगलादेशप्रमाणे झाली नाही, असे मत लोढा यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नऊ वर्षांतील कार्य घराघरांत पोहाेचविण्याचे आवाहनही लोढा यांनी केले. देश कार्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाणे खणखणीत आहे. देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीला हक्क मिळवून देण्याचे कार्य मोदींकडून करण्यात आले.
२२० कोटी डोस मोफत दिलेकोरोनावरील २२० कोटी डोस मोफत देण्याची कामगिरी केवळ भारतातच घडते, असे आमदार डावखरे म्हणाले. पुन्हा मोदींचेच सरकार येण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्य करण्याचे आवाहन माजी खा. संजीव नाईक यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे, निवडणूकप्रमुख मनोहर डुंबरे, माजी नगरसेवक मुकेश मोकाशी, अर्चना मणेरा, स्नेहा आंब्रे, जिल्हा सरचिटणीस विलास साठे, भाजयुमोचे शहराध्यक्ष सारंग मेढेकर आदी उपस्थित होते.