लोनाड : भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांचा अद्याप संपर्क झालेला नाही. त्यामुळे ते परत आल्याशिवाय त्यांची भूमिका समजणार नाही. ते शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे निवडून आलेले आहेत. त्यामुळे आमच्याजवळचे असले तरी पक्ष साेडून गेले तर त्यांचा आमच्याशी काहीही संबंध राहणार नाही, असा इशारा शिवसेनाठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी रविवारी दिला. भिवंडीतील अजयनगर येथील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात पक्षातील सध्याच्या घडामाेडी व त्यामुळे शिवसैनिकांत संभ्रम निर्माण झाल्याने प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिकांची बैठक पार पडली. शिवसेनेकडून आपल्याला काेणत्याही पदाची अपेक्षा नाही. आपला शेवटचा श्वास शिवसेनेच्या भगव्यासोबत राहील. पक्षाबाबतचा अंतिम निर्णय हा पक्षप्रमुख घेतील. त्याबाबत सर्व शिवसैनिकांना समजेलच, ताेपर्यंत शिवसैनिकांनी विचलित होऊ नये, असेही पाटील म्हणाले.
या वेळी शिंदे समर्थकांनी लावलेल्या बॅनरवरून आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी बॅनर काढण्याची मागणी केली. त्या वेळी ते बॅनर काढण्याच्या सूचना तालुकाप्रमुख विश्वास थळे यांनी दिल्या. तसेच एकनाथ शिंदे, शांताराम माेरे यांच्याविराेधात जाेरदार घाेषणा देण्यात आल्या.
बैठकीला जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, उपजिल्हाप्रमुख देवानंद थळे, महिला जिल्हा संघटक कविता भगत, तालुकाप्रमुख विश्वास थळे, माजी तालुकाप्रमुख तुळशीराम पाटील, कृष्णा वाकडे, रविकांत पाटील, अनंता पाटील, गोकुळ नाईक, प्रकाश तेलिवरे, पंचायत समितीच्या सभापती ललिता जोशी, विद्या थळे, फशीबाई पाटील, कल्पना भोईर, युवासेनेचे राजू चौधरी, तालुका सचिव जय भगत, राजेंद्र काबडी, तालुक्यातील उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, सेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘सेनाभवनावरून येणारी भूमिकाच अंतिम’सेनाभवनावरून जी भूमिका जाहीर हाेईल, तीच अंतिम असते. त्यामुळे पदाधिकारी वैयक्तिक मत मांडू शकत नाही. त्याच्यासाठी पक्षाचा आदेश अंतिम असतो, असेही पाटील यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सहकार्य करू या, असे आवाहनही त्यांनी केले.