ठाणे : मी कॉंग्रेसमध्ये केव्हांही जाणार नव्हतो. त्यावेळेस उलट उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव टाकण्यासाठी या मंडळींना माझ्या सारख्या तरुण कार्यकर्त्याचा वापर केला होता. ही बाब लक्षात आल्यानंतर मी स्वत: जाऊन उद्धव ठाकरे यांना भेटून कशा पद्धतीने ब्लॅकमेलिंगचे काम केले जात आहे, याची माहिती दिली होती, असे स्पष्टीकरण देत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी खासदार राजन विचारे यांच्यावर पलटवार केला आहे.
भास्कर पाटील हे आमच्या सोबतच असल्याचा दावा सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आली होती. परंतु मंगळवारी म्हस्के हे पाटील यांना घेऊनच अवतरले आणि विचारे यांनी केलेल्या आरोपांवर पलटवार केला. मला मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचा एबी फॉर्म आला होता, विधान परिषदेचे देखील तिकीट मला मिळत होते. मात्र मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. त्यामुळे पक्षनिष्ठा आणि शिवसेना काय असते हे तुम्ही सांगू नका असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विचारे यांची निष्ठा ही केवळ त्यांच्या प्रभागापूरतीच वेळोवेळी दिसून आली आहे. त्यांच्या मुलाने महापालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. केवळ प्रभागपुरते विचार करीत असल्याने आणि वारंवार पक्षविरोधी कारवाया करीत असल्यानेच स्वर्गीय दिघे यांनी त्यांना बाजूला सारले होते असा आरोपही त्यांनी केला. मात्र आम्ही स्वत: तुम्हाला त्यातून बाहेर काढले आज जे काही तुम्ही आहात, ते केवळ एकनाथ शिंदेमुळेच आहात हे तुम्ही कसे विसरलात असा सवालही त्यांनी केला.
नारायण राणे हे कोकणचे असल्याने सगळ्या कोकणवासियांनी त्यांच्या मागे जाण्याचा विचार केला होता. त्यात विचारे देखील होते, परंतु मला जाण्याची इच्छा नसतांनाही केवळ माझ्या सारख्या कार्यकर्त्याचा वापर करुन उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव टाकण्याचे कटकारस्थान करण्याचे काम याच मंडळींनी केले होतो असा उलट आरोप म्हस्के यांनी केला आहे. महापालिका निवडणुका लावण्याच्या वेळेस सत्तेत कोण होते. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्यांनी का नाही लावल्या, त्यावेळेस निवडणुका असा सवाल उपस्थित करीत त्याचे खापर आमच्यावर फोडू नका असेही त्यांनी सांगितले.
भास्कर पाटील अवतरलेमी पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे, मला कोणीही जबरदस्ती केलेली नाही, किंवा कोणत्याही जुन्या केसस बाहेर काढण्याची धमकी दिलेली नाही. त्यामुळे माझा भाऊ किंवा इतर मंडळी जे सांगत आहे, ते चुकीचे असून त्याला कोणताही आधार नसल्याचे भास्कर पाटील यांनी स्पष्ट केले. मी विचारे यांच्या घरी गेलो होतो, मात्र त्यांनीच मला बोलावले होते, ते खासदार असल्याने त्यांना तो मान मी दिला होता, असेही त्यांनी सांगितले. मला पद कसे दिले गेले याबाबत मीच अनभिज्ञ असल्याचा दावाही त्यांनी केला. एकूणच भास्कर पाटील अवतरले आणि त्यांना ठाणे शहर विधानसभा क्षेत्राच्या समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली. त्याचे पत्रही त्यांना देण्यात आले.