लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसी हद्दीत बुधवारी पहिल्यादिवशी अवघ्या चार तास झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांच्या घरांत पाणी शिरले. मग नालेसफाईवर खर्च केले जाणारे कोट्यवधी रुपये कोणाच्या घशात जातात, असा संतप्त सवाल भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.
नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने तेथे गायकवाड यांनी धाव घेतली. तसेच कल्याण पूर्वेतील वालधुनी नदीशेजारी नाल्याजवळही त्यांनी भेट दिली. तेथे त्यांनी केडीएमसीचे प्रभाग अधिकारी सुधीर मोकल आणि दीपक भोंगाडे यांना बोलावून घेतले.
गायकवाड म्हणाले, नालेसफाईवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मे महिन्याच्या अखेरीस आणि पाऊस पडण्याच्या १० दिवस आधी नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली जाते. नालेसफाईच्या पाहणीचा स्टंट प्रशासनाकडून केला जातो. पहिल्या पावसाच्या प्रवाहातच सगळा कचरा वाहून जातो. काही ठिकाणी पोकलेन मशीन आणून ठेवली जातात. काम केल्याचे भासविले जाते; मात्र पहिल्या पावसात नालेसफाई नीट न झाल्याने सखल भागांतील चाळवजा घरांत पाणी शिरले. याला महापालिका प्रशासन जबाबदार आहे. कोट्यवधी रुपयांचे नालेसफाईचे टेंडर हे सत्ताधाऱ्यांशी संबंधित असलेले लोकच घेतात. पडद्याआडून भ्रष्टाचार केला जातो. नागरिकांच्या करातून वसूल केलेल्या पैशाचा अपव्यय केला जातो. पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्यामुळे या कामासाठी कोणत्या अधिकारी आणि सत्ताधाऱ्याचा मी सत्कार करू, हे देखील सत्ताधाऱ्यांनी सांगावे, असेही गायकवाड म्हणाले.
------------------