मीरा रोड : काशिमीरा येथील मुन्शी कम्पाउंड येथे दीड महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या सोमवारच्या ‘हॅलो ठाणे’मध्ये प्रसिद्ध झाले. याची दखल घेत पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर काम करून १३ गळक्या वाहिन्या शोधल्या. दोन दिवसांत नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल, असा आशावाद अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.झोपडपट्टी परिसरात पालिकेने गटार खणून अर्धवट ठेवल्याने गटार तुंबले आहे, जेणेकरून गटारातून जाणाऱ्या जुन्या जलवाहिन्यांमध्ये गटाराचे पाणी जात होते. परिणामी, पाणी येताच रहिवाशांना दुर्गंधीयुक्त पाणी मिळते. या दूषित पाण्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. ‘लोकमत’मधील वृत्तानंतर पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता उत्तम रणदिवे यांनी युद्धपातळीवर काम सुरू केले. परिसरात पाच ठिकाणी खणून गटारातून जाणाऱ्या सुमारे १३ सडलेल्या जलवाहिन्या शोधल्या. त्यांची दुरु स्ती हाती घेतली आहे. पालिकेचा पाणीपुरवठा सुमारे ४५ तासांनी होत असल्याने मुख्य जलवाहिनी रिकामी राहते. परिणामी, त्यावर असणाऱ्या गळक्या वाहिन्यांमधून गटाराचे पाणी मुख्य जलवाहिनीत साचते, आणि लोकांना दूषित पाणी येते. (प्रतिनिधी)
काशिमिऱ्यात १३ सडक्या वाहिन्या
By admin | Published: April 19, 2016 2:09 AM