सुरेश लोखंडे / ठाणेठाणे, उल्हासनगर या दोन्ही महापालिकांच्या २०९ नगरसेवकांच्या निवडीसाठी सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी एक हजार २८४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांना १६ लाख ३५ हजार ४३१ मतदार मतदान करणार आहेत. पसंतीच्या नगरसेवकास जास्तीतजास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी महापालिका प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करून सवलतींचादेखील वर्षाव केला आहे.मतदारास एकाच वेळी चार उमेदवाराना जंबो मतदान करण्याचा हक्क या निवडणुकीत बहाल झाला आहे. उल्हासनगर महापालिकेच्या ७८ नगरसेवकांना निवडून देण्यासाठी चार लाख सहा हजार ८७९ मतदाराना मतदान करण्याचा हक्क मिळालेला आहे. यासाठी ४७९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना या प्रमुख पक्षांसह आघाडीतील छोटेमोठे पक्षाचे उमेदवार पॅनलमध्ये एकत्र येऊन नशिब अजमावत आहेत. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदानाच्या काळात मोठमोठी हॉटेल्स, बार, रेस्टॉरंटमधील खाण्यापिण्यावर २० टक्के सवलत लागू केल्याचे उल्हासनगर निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी लोकमतला सांगितले. शहरातील ७० हजार विद्यार्थी मतदानाचे निमंत्रणकार्ड आईवडिलांना देऊन मतदानासाठी हट्ट करणार आहेत. चार प्रमुख ठिकाणांहून मतदान प्रभात फेरी काढणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.या निवडणुकीसाठी उल्हासनगर विधानसभेच्या दोन लाख ६२ हजार ८३७ मतदारांसह अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील काही मतदार असे चार लाख सहा हजार ८७९ मतदार मतदान करणार आहेत. तर ठाणे मनपाच्या १३१ नगरसेवकांसाठी ८०५ उमेदवार रिंगणात आहेत. त्याना १२ लाख २८ हजार ५९२ मतदार मतदान करणार आहेत.
उल्हासनगर शहरात १६ लाख मतदार
By admin | Published: February 15, 2017 4:40 AM