लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दिवसेंदिवस ठाणे शहरात कोरोनाबाधिताची संख्या झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेने उभारलेल्या कोविड केअर हॉस्पिटलसह खासगी रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी रुग्णांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परंतु, दुसरीकडे महापालिका क्षेत्रात २२ टक्के बेड शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात रुग्णांना सर्वाधिक आवश्यकता असलेल्या अतिदक्षता विभागातदेखील ११ टक्के बेड शिल्लक आहेत. मात्र, तरीदेखील रुग्णांना बेडसाठी वणवण करावी लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तीन-चार महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली असताना फेब्रुवारी महिन्याच्या पंधरवड्यानंतर बाधितांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली. ठाणे शहरातील बाधित रुग्णांची रोजची संख्या थेट दीड हजार ते दोन हजारांच्या आसपास पोहोचली. झपाट्याने वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे खासगी आणि महापालिकेने उभारलेल्या कोविड केअर हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या अपुरी पडू लागली आहे. त्यात अनेकांना ऑक्सिजन बेडसह व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नसल्याची ओरड होत आहे, तर अनेक रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना निदर्शनास येत आहेत. असे असताना ठाणे शहरात खासगी रुग्णालयांसह महापालिकेच्या कोविड केअर हॉस्पिटलमध्ये चार हजार ६६६ इतकी बेडची संख्या आहे. त्यापैकी विविध रुग्णालयातील तीन हजार ६४६ बेडवर रुग्ण दाखल असून, एक हजार २० बेड शिल्लक आहेत. हे प्रमाण २२ टक्के इतके आहे. त्यात विविध रुग्णालयांत सर्वसामान्य (जनरल) बेड एक हजार १४९ इतके असून, त्यापैकी ४७५ बेड शिल्लक आहेत. तसेच सध्याच्या घडीला रुग्णांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजन बेडची संख्या दोन हजार ६७१ इतकी असून, केवळ ३०३ बेड शिल्लक आहेत.
तसेच अतिदक्षता विभागात ८४६ इतके बेड असून, त्यातील ६०४ बेडवर रुग्ण दाखल असून, त्यातील २४२ बेड शिल्लक आहेत. तसेच अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या रुग्णांना आवश्यक असणाऱ्या व्हेंटिलेटर बेडची संख्या २६५ इतकी असून, त्यातील केवळ ९२ बेड शिल्लक असल्याची माहिती महापालिकेने दिली.
nशहरात रुग्णांना कोणत्याही अडचणीशिवाय बेड उपलब्ध व्हावे, यासाठी कोविड वॉररूमची उभारणी महापालिकेने केली. तिच्या माध्यमातून रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यात येत आहे.nमात्र, असे असतानादेखील रुग्णांना याच वॉररूममधून बेड शिल्लक नसल्याचे अनेकदा सांगण्यात येत आहे. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.