ठाणे : महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या १५ ते २० दिवसांपासून निर्माण झालेल्या औषधांच्या तुटवड्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे तातडीच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मुंबईच्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. औषधे आणि इतर साहित्य पुरविण्याचा ठेका संपून तब्बल नऊ महिने उलटले असूनही नवे टेंडर निघाले नसल्याने रुग्णालयावर ही वेळ आली आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून रु ग्ण आणि डॉक्टरांमध्ये मोठा वाद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. महापालिकेच्या या रु ग्णालयात अंबरनाथ, कल्याण, शहापूर, उल्हासनगर, ठाणे, मुंब्रा, कळवा, दिवा, घोडबंदर आदी विभागांतील गरीब रुग्ण येतात. रोज किमान ३०० ते ४०० रुग्ण ओपीडीकरिता येतात. येथे होणाऱ्या प्रसूतीचे प्रमाणही मोठे असते. बालरुग्णांची संख्याही अधिक आहे. तसेच अपघाताचे रुग्णही येथे येतात, असे असतानाही ठामपा प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. मागील १५ ते २० दिवसांपासून रुग्णांच्या उपचाराकरिता लागणारी साधने रुग्णालयाला न पुरविल्याने गरीब रुग्णांना ती बाहेरून आणावी लागत आहेत. त्यामध्ये सुया, हातमोजे, सलाइन, थर्मामीटर, कॉटन, बँडेज आदींसह अनेक इतर औषधांचाही समावेश आहे. प्रसूतीसाठी कल्याण, उल्हासनगर आदी दूरच्या परिसरातून रात्रीच्या वेळेस महिला रुग्ण दाखल झाल्यावर त्यांच्या नातेवाइकांना रात्री हातमोजे, सलाइन, कॉटन आदींसाठी रु ग्णालयाच्या बाहेर धावपळ करावी लागते. ८०० रुपये नसल्याने एका रुग्णाचे बालक दगावल्याची घटनाही काही महिन्यांपूर्वी घडली होती. मात्र, त्यानंतरही रु ग्णालय प्रशासनाने याबाबत काही दखल घेतल्याचे अजिबात दिसून येत नाही. (प्रतिनिधी)
रुग्णालयातच औषधे नाहीत
By admin | Published: November 20, 2015 2:09 AM