ठाणे : वर्तकनगर येथील दोस्ती विहार या वसाहतीत राहणाऱ्या सुमारे २४० कुटुंबांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांना नवीन जोडणी मंजूर झाली असली तरी त्याचे काम विकासकाकडून होत नसल्याच्या निषेधार्थ रहिवाशांनी क्लब हाउसलाच सोमवारी टाळे ठोकले होते. वर्तकनगर पोलिसांत धाव घेऊन याप्रकरणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी तक्र ारही त्यांनी दाखल केली आहे.वर्तकनगर भागातील या गृहसंकुलात २० आणि त्याहून जास्त मजल्यांच्या १७ इमारती आहेत. त्यापैकी वृष्टी ए, बी आणि सी या तीन इमारतींमध्ये २४० कुटुंबे वास्तव्याला आहेत. सुरुवातीपासूनच या तीन इमारतींमध्ये पाणीटंचाईची समस्या होती. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून ही समस्या मांडली. या इमारतींना दररोज १ लाख १७ हजार लीटर्स पाण्याची गरज असताना केवळ ८० हजार लीटर्स पाणीपुरवठा होतो. त्यात, दरबुधवारी पाणी बंद असल्याने पुढील तीन दिवस टंचाईचा सामना करावा लागतोे. त्यामुळे रहिवाशांच्या मागणीनंतर ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबर २०१६ येथे नवीन जोडणीसाठी मंजुरी दिली. त्यानंतर, विकासकाने तातडीने हे काम पूर्ण करून समस्या सोडवणे अपेक्षित होते. मात्र, त्या कामात दिरंगाई होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रविवारी विकासकासमवेत बैठक आयोजली होती. मात्र, विकासकाचा कोणताही जबाबदार प्रतिनिधी तिथे हजर नसल्याने रहिवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. विकासकाविरोधात घोषणाबाजी करून त्यांनी सोसायटीच्या क्लब हाउसलाच टाळे ठोकले. त्यानंतर, थेट वर्तकनगर पोलीस ठाण्यात पाण्याच्या प्रश्नावरून कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, अशी तक्र ारही दाखल केली. सोमवारीसुद्धा क्लब हाउस रहिवाशांनी बंदच केले होते. हे प्रकरण चिघळण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर पोलिसांनी पाइपलाइनचे काम दिलेल्या ठेकेदाराला बोलवून समज दिली. दोन दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन त्याने रहिवाशांना दिले आहे. मात्र, त्याची पूर्तता न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे. यासंदर्भात विकासक राजेश शहा यांनी पाणीसमस्येची बाब मान्य केली आहे. ती सोडवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लवकरच रहिवाशांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल, असेही स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
दोस्ती विहारच्या २४० कुटुंबांना पाणी नाही
By admin | Published: January 10, 2017 6:22 AM