कुमार बडदे, मुंंब्राएका बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा तसेच दुसऱ्या बाजूने विस्तीर्ण खाडी अशा निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या व राज्यातील अतिसंवेदनशील शहरापैकी एक म्हणजे मुंब्रा-कौसा. या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांना नेहमीच दक्ष राहावे लागते. पूर्वी रबाळे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मुंब्रा पोलीस चौकीला २७ वर्षांपूर्वी पोलीस ठाण्याचा दर्जा मिळाला. सुमारे १२ लाखांची लोकसंख्या या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असूनही या ठिकाणी अवघे १०६ पोलीस आहेत. अपुरे संख्याबळ आणि नादुरुस्त वाहनांबरोबरच अनेक समस्या इथेही आहेत.रेतीबंदर ते वाय जंक्शन तसेच दिव्यातील दातिवली, आगासन आदी सहा गावांसह आठ किलोमीटरचा परिसर या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येतो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांच्यासह तीन पोलीस निरीक्षक, आठ सहायक निरीक्षक, १० उपनिरीक्षक असे २१ अधिकारी तर २४ महिला आणि ६१ पुरु ष कर्मचाऱ्यांची उपलब्धता या ठिकाणी आहे. प्रत्यक्षात आणखी दोन निरीक्षक, पाच उपनिरीक्षक, दोन महिला अधिकारी आणि ५० पोलिसांची या ठिकाणी आवश्यकता आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे कक्ष, मुद्देमाल कक्ष या सर्वांसाठी अपुरी जागा आहे.अमृतनगर, मुंब्रा रेल्वे स्टेशन,अल्मास कॉलनी आणि दिवा रेल्वे स्टेशन या चार बीट चौक्या अपुऱ्या जागेत आहेत. गस्तीसाठी तसेच आरोपींना ने-आण करणे, मोर्चा तसेच इतर बंदोबस्तासाठी तीन जीप आहेत. त्यातील एक धक्कास्टार्ट आहे. इथे चांगल्या दोन वाहनांची गरज आहे. हाणामाऱ्या, विनयभंग तसेच एकमेकांविरोधात खोट्या तक्रारीही दाखल होण्याचे प्रमाण इथे अधिक आहे. त्या तक्रारींची शहानिशा करण्यातही पोलिसांचा बराच वेळ खर्ची होतो. बऱ्याचदा राजकीय दबावाच्या त्रासालाही येथील पोलिसांना सामोरे जावे लागते. मात्र, अधिकाऱ्यांच्या कठोर भूमिकेमुळे पोलीस ठाण्यातील राजकीय नेत्यांचा वावर काहीअंशी तरी कमी झाला आहे. येथे शीळ-डायघर पोलीस ठाण्यातील आरोपीही आणले जात असल्याने कोठडी अपुरी पडते. स्वच्छतागृह आणि पाण्याचीही गैरसोय आहे.
१२ लाख लोकसंख्येसाठी आहेत अवघे १०६ पोलीस
By admin | Published: August 09, 2015 11:14 PM