भिवंडी: भिवंडीत स्वच्छ भारत अभियानाचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे चित्र शहरात ठीक ठिकाणी साचलेल्या कचऱ्यांच्या ढिगांवरून पाहायला मिळत आहे. महापालिकेने स्वच्छ भारत अभियान २०२३ मध्ये भाग घेतला असून शहरात ठीक ठिकाणी पडीक भिंतींना रंग देण्याचे काम महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या भिंतीवर स्वच्छतेबाबतचे सुविचार काढून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सध्या महापालिका प्रशासन करत आहे. मात्र या रंगविलेल्या भिंतींच्या खालीच कचऱ्याचे ढिग साचले आहेत.
भिवंडी शहराला दोन एमएलडी पाणीपुरवठा करणाऱ्या वराळदेवी तलावाच्या बाजूला असलेल्या विसर्जन घाटाच्या परिसरात महापालिकेने स्वच्छ भारत अभियानाची माहिती देण्यासाठी माझी वसुंधरा व स्वच्छता अभियानाची माहिती देणारे भिंती रंगवले आहेत. या रंगविलेल्या भिंतींखालीच मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. स्वच्छतेकडे वाटचाल करणारे शहर म्हणून भिवंडी महापालिकेला मागील काही वर्षांपूर्वी केंद्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे मात्र पुरस्कार प्राप्त होऊनही आजही शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे.
मागील नऊ महिन्यांपासून भिवंडी महापालीकेत प्रशासकीय राजवट असून या प्रशासकीय राजवटीत शहरातील कचरा समस्या अधिक गंभीर झाली असल्याने महापालिका आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ नागरिकांच्या कचरा समस्येकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. दुसरीकडे शहरात कचरा उचलणाऱ्या ठेकेदारांवर मात्र कोट्यावधी रुपयांची उधळण मनपा प्रशासन करत आहे.