वाडा : मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेल्या वाडा तालुक्यात गेल्या अनेक वर्षात अग्निशमन केंद्र मात्र उभारण्यात आलेले नाही. येथील कारखान्यांमध्ये वारंवार आगी लागत असून त्या विझविण्यास होणाऱ्या विलंबामुळे कारखान्यांचे कोट्यावधी रू. चे नुकसान होत आहे. या पट्ट्यात एक हजाराच्या वर लहान मोठे कारखाने आहेत. तरीहीे अग्निशमन केंद्र नाही. वाडा तालुका ‘डी प्लस झोन’ जाहीर झाल्यापासून या परिसरात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या दाखल झाल्या आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झाले असून १००० च्या वर कारखाने आहेत. त्यामध्ये अनेक रासायनिक कारखान्यांचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांच्या कालावधीत तालुक्यात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. डोंगस्ते येथे अे. आय. के. या रासायनिक कंपनीत रिअॅक्टरचा स्फोट होऊन त्यात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. वाडा शहरातील विजय सॉ मिलला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागून ही गिरणी खाक झाली. त्यात २० लाखाहून अधिक रूपयांचे नुकसान झाले. वडवली येथे असलेल्या ओनिडा कंपनीच्या गोदामाला लाग लागून लाखो रू. चे नुकसान झाले होते. सापरोंडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतल पराग केमिकल या कंपनीचे आगीत ६० लाखांचे नुकसान झाले. कोंढले येथील फायब्रॉल नॉन आईनिक्स प्रा. लि. ही रासायनिक कंपनी पूर्ण खाक झाली. वसुमती प्रिंट अॅण्ड पॅकेजिंग या कंपनीचे आगीत चार कोटीचे नुकसान झाले. वसुरी येथील सोलोमेटल कारखान्यात स्फोट होवून सात कामगार जखमी झाले होते. नुकताच मुसारणे फाटा येथे लाकडाच्या वखारीला आग लागून पंधरा लाखांचे नुकसान झाले तर शुक्रवारी रात्री वाडा आगाराची एक बस पेटून व अन्य दोन गाड्यांना त्याची झळ लागुन २० लाखांची हानी झाली अशा अनेक घटना घडत असल्याने तालुक्यात अग्निशमन केंद्राचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.(वार्ताहर)
कारखाने हजार पण अग्निशमनदल नाही
By admin | Published: April 11, 2016 1:13 AM