ठाणे : गेल्या संपूर्ण वर्षभरात ६१६ तक्रारदारांना त्यांचा जबरी चोरी तसेच इतर गुन्ह्यांतील सात कोटी ५० लाख सात हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अभिहस्तांतरित केला. तर, सोमवारी ६८ फिर्यादींना ५६ लाख १२ हजारांचा ऐवज परत केला. अशा प्रकारे मुद्देमाल हस्तांतरणाच्या माध्यमातून पोलिसांवरील जनतेचा विश्वास वाढणार असून या दोघांचेही संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी व्यक्त केला.
ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-१ च्या वतीने जबरी चोरी, चोरी तसेच वाहनचोरीतील गुन्हे उघड केल्यानंतर आरोपींकडून हस्तगत केलेला मुद्देमाल ६८ जणांना सोमवारी स्वामी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्टÑ पोलीस दलाच्या स्थापना दिवसानिमित्त २ जानेवारीपासून पोलिसांच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत उपायुक्त कार्यालयाच्या आवारात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात नौपाडा, ठाणेनगर, कळवा, मुंब्रा, डायघर आदी पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातून लुटीस गेलेल्या ऐवजाचे उत्कृष्टरीत्या अन्वेषण करून हे गुन्हे उघड केले. वर्षभरात सोनसाखळी जबरी चोरी तसेच इतर गुन्ह्यांमधील चार हजार ६३६ ग्रॅम (चार किलो ६२६ ग्रॅम) वजनाचे एक कोटी ५२ लाख ९२ हजार ६२८ किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. तसेच १०९ दुचाकी, २८ तीनचाकी, ५५ चारचाकी वाहने असा तीन कोटी ८२ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत झाला. याशिवाय, एक कोटी तीन लाख ६८ हजार ७०० रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि ८६ व्यक्तींची एक कोटी १० लाख ५६ हजार ६८२ ची रोकड जप्त केली. असा २०१८ या संपूर्ण वर्षभरात सात कोटी ५० लाख सात हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. न्यायालयाच्या आदेशाने ९१ लाख ७९ हजारांचे तीन किलो ७५० ग्रॅम सोन्याचे दागिने परत केले. तर ७५ दुचाकी, २७ तीनचाकी, ३४ चारचाकी वाहनांसह मोबाइल, लॅपटॉप आणि २९ तक्रारदारांची ९५ लाख ४८ हजार ८३७ रुपयांची रोकड असा पाच कोटी चार लाख ७४३ रुपयांचा मुद्देमाल संबंधितांना परत केला. याव्यतिरिक्त रेझिंग डे च्या अनुषंगाने ७ जानेवारी रोजी सोनसाखळी जबरी चोरीसह विविध गुन्ह्यांतील २१ लाख ८७ हजार ८०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच १४ दुचाकी, दोन तीनचाकी, पाच चारचाकी अशी २१ लाख ५५ हजार ७४२ हजारांच्या वाहनांसह ५४ लाख ९६ हजार ७७० किमतीचा मुद्देमाल ६८ फिर्यादींना स्वामी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.पोलीस जनतेसाठी असून चोरीतील ऐवज पुन्हा मिळवून दिल्यास जनतेमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण होतो. जनता-पोलीस दुरावा दूर झाला पाहिजे. तेव्हा गुन्हेगारांवर नक्कीच वचक राहील. नागरिक हे साध्या वेशातील पोलीस असून अशा उपक्रमांद्वारे पोलीस-जनता संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास स्वामी यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ, अभय सायगावकर तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, संजय धुमाळ, रविकांत मालेकर, शेखर बागडे, मंगेश सावंत आणि तुकाराम पोवळे आदींसह फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.माझी १४ ग्रॅम वजनाची सोनसाखळी १९ आॅगस्ट २०१८ रोजी सिद्धी टॉवर येथून चोरट्यांनी जबरीने चोरली होती. याबाबत तक्रार केल्यानंतर नौपाडा पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मेहनतीने चोरट्यांकडून १० ग्रॅमचे सोने हस्तगत केले. ते आज परत मिळाले. खूप आनंद झाला. तो शब्दांतही व्यक्त करता येत नाही.’’- शरयू फणसे (८०),फिर्यादी, नौपाडा, ठाणेआईची सोनसाखळी गेली तेव्हापासून आजपर्यंत कोणताही पाठपुरावा करावा लागला नाही. थेट सोनसाखळी चोरट्यांकडून मिळवल्याचे पोलिसांकडून समजले. त्यानुसार, त्यांनी हस्तांतरण कार्यक्रमात सोने परत केले. पोलिसांचे खूप आभारी आहोत.’’- डॉ. समीर फणसे, नौपाडा, ठाणे (फिर्यादी शरयू यांचे चिरंजीव)