ठाणे : माणसामध्ये डावा आणि उजवा असे दोन मेंदू कार्यरत असतात. त्यातील डावा मेंदू हा अतिवैचारिक असतो. तो सतत आपल्याला हे करू नको, ते करू नको अशा सूचना करत असतो, तर उजवा मेंदू हा भावनिक असतो, नेणिवांचा असतो. तो आपल्याला भावनिक व्हायला भाग पाडतो. या दोन्हीमध्ये समन्वय साधणे हे लेखकाचे काम असते. लेखकांनी उजवा मेंदू अधिक वापरावा, कारण आपल्या मनात जे येते ते खरे असते. कारण आपल्या नेणिवांमध्ये ते येत असते.
उजवा मेंदू नेणिवांचेच काम करत असतो. फक्त लेखक म्हणून आपल्याला ती चौकट बरोबर सांभाळावी लागते. समतोल ठेवत संवेदन वास्तवाशी जोडत लोकांना योग्य ते शिकवत राहणे गरजेचे असते. लेखकांनी नेमके हेच करायला हवे, असे आग्रही प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी येथे बोलताना केले. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या राज्यस्तरीय लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात आयोजित प्रकट मुलाखतीत शंभू पाटील यांनी खुमासदार शैलीत नेमाडे यांना बोलते केले.
हेच तर अच्छे दिन...चौकटीत लिहिणे बरेचदा दुर्देैवाने मला जमत नाही. त्यामुळेच गेली पाच वर्षे मी पोलिस सुरक्षेखाली आहे. ही खरे तर वाईट परिस्थिती आहे. ‘अच्छे दिन’ यालाच म्हणतात असं मी मानतो, असे नेमाडे म्हणाले.
स्मार्टफोनवर बंदी आणा युरोपात आता मोबाइलवर बंदी आणायचे चालले आहे. मेंदूत ५०-६० सेंटर्स असतात, पण मोबाइलमुळे त्यापैकी तुमच्या मेंदूचा एकच भाग काम करतो. हे संशोधनातूनही समोर आलेले आहे. त्यामुळे कायदेशीररीत्या मोबाइलवर बंदी घातली गेली पाहिजे, असे ठाम मत नेमाडे यांनी यावेळी मांडले.
‘हिंदू’चा पुढचा भाग कधी? भारत-पाकिस्तान संबंध सुधारणार का, सलमान खानचे लग्न होणार का, हे प्रश्न जसे वर्षानुवर्षे सतावतात, तसेच नेमाडेंच्या ‘हिंदू’चा पुढचा भाग येणार का, हा प्रश्न सतावत राहतो, असे मुलाखतकार शंभू पाटील यांनी विचारताच नेमाडे मिश्कील हास्य करत म्हणाले, हिंदू लिहायला मी १९७६ साली सुरुवात केली आणि ती प्रत्यक्षात प्रकाशित झाली २०१० साली. म्हणजे जवळपास ४० वर्षांनी... त्यामुळे पुढचा भागही ४० वर्षांनी येईल असे नाही. वर्षभरात ‘हिंदू’चा पुढचा भाग नक्की येईल. त्याच वेळी ‘सट्टक’ हा नवीन कवितासंग्रह येत असल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रीयता ही तर अतिशय भंपक कल्पनाआदिम काळात मानव जसा शिकारी होता तसाच तो आजही आहे. आजही दर सेकंदाला कुठे ना कुठे बलात्कार, खून, मारामाऱ्या होत असतात. आरोपी वर्षानुवर्षे सापडत नाहीत, हेच आपले अच्छे दिन आहेत, अशी उपरोधिक टिप्पणी नेमाडे यांनी केली. मी पाकिस्तानात गेलो, चीनमध्येही गेलो आहे. तिथेही आपल्यासारखेच लोक आहेत. लोक सगळीकडे चांगलेच असतात, पण वाईट असतात ती त्या त्या देशांमधली सरकारे. विविध देशांमधील सरकारेच आपल्यामध्ये भांडणे लावून देतात, झुंजी लावून देतात. त्याच्या मुळाशी धर्म आणि राष्ट्रीयता असते. राष्ट्रीयता ही तर अतिशय भंपक कल्पना आहे. अशा स्थितीत लेखकांनी धर्म आणि राष्ट्रीयता न मानता सजगपणे लेखन करून ते थोपवायला हवे, असे आग्रही प्रतिपादन भालचंद्र नेमाडे यांनी या मुलाखतीवेळी केले.
इंग्रजी माध्यमांच्या शाळा नकोच
आपल्याकडे इतर देशांच्या तुलनेत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याचे प्रमाण भयंकर वाढले असल्याचे सांगत इंग्रजी माध्यमांच्या शाळांवरही कायद्याने बंदी घातली पाहिजे, असे मत नेमाडे यांनी व्यक्त केले. नेमाडे म्हणाले की, कोरिया, चीन, जपान, फ्रान्स, जर्मनी हे कुणीच इंग्रजी शिकवत नाहीत. तिथे दोन-चार लोक इंग्रजी शिकून घेतात. पण आपल्या देशात ४०-५० टक्के लोक इंग्रजी शिकतात. इंग्रजी माध्यमात शिकतात हे चुकीचे आहे. हे कायद्यानेच बंद करण्याची परिस्थिती आज आहे. शेवटी सरकार कशासाठी आहे, असा सवाल नेमाडे यांनी उपस्थित केला.