ठाणे : जिल्ह्यातील अनधिकृत रेती व गाैणखनिज उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांच्या संयुक्त ताकदीवर जिल्ह्याभरातील अधिकाऱ्यांनी रेती व गाैणखनिज माफियांना धारेवर धरल आहे. रात्री, बेरात्री अधिकारी रस्त्यांवर, खाडीत जाउन माफियांची मनमानी माेडीत काढण्यात येत आहे. आठ पथक तैनात असून त्यांनी ठिकठिकाणी १३ वाहने जप्त केली आहेत. तर ११ रेतीच्या कुंड्या नष्ठ केल्या आहेत. त्यामुळे रेती, गाैणखनिज माफियांचे धाबे दणाणले आहे.
शनिवारी रात्र येथील उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील व तहसिलदार युवराज बांगर यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई परिसरात रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यातआली आहे. या अधिकाऱ्यांच्या पथकाने मुंब्रा मंडळ तील कर्मचाऱ्यांनी मौजे साबे व डावले येथील खाडी पात्रालगत अनधिकृत रेती साठवणूकासाठी वापरण्यात येणाऱ्या ११ कुंड्या जेसीबी ने नष्ट केल्या आहेत. अंबरनाथ तहसिलदार प्रशांती माने यांच्या पथकाने अंबरनाथ परिसरात रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात आली आहे.
या माफियांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी भिवंडीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आठ पथकांनी गेल्या तीन दिवसांपासून मध्यरात्री विविध रस्त्यांवरील वाहनांवर धाड टाकली. या दरम्यान तब्बल १३ अनधिकृत गाैणखनिज व रेतीच्या वाहनांना पकडून जप्त केली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रेतीमाफियांची धाबे दणाणले असून एकच खळबळ उडाली आहे.