ठाणे : पावसाळा जवळ आला असतांना आजही ठाणे शहरातील विविध भागात नाले सफाईच्या कामांच्या गंगाटळ्या सुरुच असल्याचे चित्र आहे. तिकडे दिवा भागात आजही नाले सफाईच्या कामांना मुहुर्तच सापडला नसल्याची बाब समोर आली आहे. मनसेचे राजू पाटील यांनी मंगळवारी येथील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. त्यावेळी हे विदारक चित्र त्यांच्या निर्दशनास आहे. यावेळी त्यांनी ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना धारेधर धरले. तर नालेसफाईच्या मुद्यावरुन महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.ठाणे महापालिका हद्दीतील नालेसफाईच्या कामांना यंदाही उशीराने सुरवात झाली. त्यात ३१ मे पर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण केली जातील असा दावा महापालिकेने केला आहे. सद्यस्थितीत ७० टक्के नालेसफाई झाली असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. तर दोनच दिवसापूर्वी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नालेसफाईच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. परंतु त्यानंतरही नालेसफाईच्या कामांना वेग आला नसल्याचेच चित्र दिसत आहे. दिव्यात नालेसफाईबरोबरच गटारात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नाल्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचे ठिकठिकाणी खच दिसून येत आहेत. मनपा कडून नाले सफाईकडे दुर्लक्ष केला जात असल्याने नागरिकांनी स्वखचार्ने कामाला सुरुवात केली असल्याचे देखील दिसून आले आहे. मात्र पावसाळा जवळ आला असताना दिव्यातील नाले सफाईसाठी कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मंगळवारी आमदार राजू पाटील यांनी दिवा प्रभाग समिती अधिकाऱ्यांसोबत दिव्यातील नैसर्गिक नाल्यांची पाहणी केली आहे. दिव्यात कोणत्याही प्रकारे नाले सफाईच काम सुरू झाले नसल्याने पावसाळ्यात नागरिकांचे हाल होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नाले सफाई संदर्भात लवकरच आयुक्तांची भेट घेणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी दिवा शिळ रोड, साबे गाव, मुंब्रा कॉलनी, दिवा स्थानक परिसरातील नाल्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतली आहे. यावेळी ठाणे मनपाला अद्याप नाले सफाईला मुहूर्त मिळाला नसल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. तर यावेळी सहाय्यक आयुक्तांनी पाटील यांनी चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले. यावेळी दिवा मनसे शहर अध्यक्ष तुषार पाटील यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.