उल्हासनगर : महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती व खड्डे भरण्याचे काम करते. मात्र यावर्षी निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने, रस्त्यातील खड्डे भरणे व दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त लागत नसल्याचे चित्र आहे.
उल्हासनगरात पावसाळा तोंडावर आल्यानंतरही रस्त्याची दुरुस्ती महापालिकेने सुरू केली नसल्याने, रस्ते खड्डेमय राहणार असल्याची टीका होत आहे. महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाले सफाई व रस्त्याची दुरुस्तीचे काम सुरू करते. नाले सफाईच्या कामाला संथ गतीने सुरवात झाली असतांना, रस्त्यातील खड्डे भरणे व रस्ता दुरुस्तीचे काम निविदा प्रक्रियेत अडकले आहे. शुक्रवारी निविदा उघडल्यावर शनिवार अथवा सोमवार रस्ते दुरुस्तीसाचे काम सुरू होण्यासाज संकेत शहर अभियंता तरुण सेवकांनी यांनी दिली. तसेच रस्ता दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर सुरू राहणार असल्याचे सेवकांनी म्हणाले.
जिओ व बीएसएनएल यांनी केबल टाकण्यासाठी रस्ते खोदले असून त्यापोटी दोन्ही कंपनीने महापालिकेला ६ कोटीचा निधी दिला. त्याच निधीतून रस्ते दुरुस्ती होणार आहेत. शहरातील रस्ते दुरुस्ती करण्याचा ठेका वेगवेगळ्या दोन कंपनीला दिला आहे. निविदा प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाल्यावर शनिवार पासून रस्ता।दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती झाली नाहीतर, रस्ते खड्डेमय होऊन अपघाताची शक्यता व्यक्त होत आहे.