ठाणे : शहापूर तालुक्यात अंत्योदय २९ हजार व प्राधान्य २७ हजार असे ५६ हजार रेशनिंग कार्डधारक आहेत. त्यामध्ये अंत्योदय कार्डधारकांना २५ कि.तांदूळ, १० कि. गहू तर प्राधान्यधारकांना प्रतिव्यक्ती ३ कि.तांदूळ, २ कि. गहू शासनाकडून वितरण करण्यात येतो.
या अंत्योदय कार्डधारकांना ऑनलाइन पावती दिली जात नाही. धान्य देताना २५ किलो लिहिले जाते. परंतु, प्रत्यक्षात २३ किलो तांदूळ व गहूची कपात दाखवून ५ ते ६ किलो दिला जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एका लाभार्थ्यांमागे दोन ते चार किलो ते तांदूळ- गहू उरवून त्याची काळ्या बाजारात विक्री केली जाते असे श्रमजीवी संघटनेचे तालुका सचिव प्रकाश खोडका यांनी म्हटले आहे. नंग दुकानदार बहुतांश गहू हा जिल्ह्यातील आटामिल व्यापाऱ्यांसह अन्य लोकांना विकतात. रेशन दुकानदार खानावळीवाले, तबेलेचालकांना ते वीस ते बावीस रुपये किलोने विकत असल्याचे वास्तव ऐकवले जात आहे.
..........
भिवंडी तालुक्यातील धान्य शिधावाटप दुकानातून घेतल्यानंतर त्याची विक्री व्यापाऱ्यांना केली जाते. हे स्थानिक व्यापारी नागरिकांकडून शिधावाटप दुकानातून मिळालेला गहू आठ रुपये किलो तर तांदूळ दहा ते बारा रुपये किलो दराने खरेदी करतात. त्यानंतर ते मोठ्या व्यापाऱ्यांना विकतात. हे धान्य स्थानिक व्यापारी भातगिरणीत तांदूळ पॉलिश करून तो २५ ते ३० रुपये किलो दराने घाऊक बाजारात विकतात. तर शिधावाटप दुकानातून आणलेला गहू साफ करून निवडून तोच गहू बाजारात १२ ते १५ रुपये किलो दराने विकतात. पीठ गिरणीत दळून गहू व तांदळाचे पीठ २० ते २२ रुपये किलो दराने विकले जात आहे.
........
प्रतिक्रिया -
लाभार्थ्यांनी दुकानातून घेतलेले अन्नधान्य त्याने स्वत:साठीच वापरायला पाहिजे; पण काही व्यसनी व जुगारी लोक या अन्नधान्याला काळ्या बाजारात विकून पैसे मिळवत असल्याचे ऐकायला आले आहे; पण त्यांनी घेतलेल्या अन्नधान्याला अन्यत्र विकू नये, अशी जनजागृती सामाजिक संघटनांनी करणे आवश्यक आहे. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याचा उद्देश सफल झाला पाहिजे.
- राजू थोटे, जिल्हा पुरवठा अधिकारी, ठाणे
--